जगभर पसरलेल्या कोविड-१९ या साथीच्या आजारामुळे कार्यालयीन बैठकांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे अशा बैठका आता झूमसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर घेण्यात येत आहेत. मात्र, अशा महत्वाच्या ऑनलाइन बैठकांमध्ये काहीजण खोटेपणा करीत असल्याचे समोर आलं आहे. मेक्सिकोतील संसदेच्या एका महत्वाच्या बैठकीत एका महिला पुढाऱ्याने चक्क खोटी हजेरी लावली. हा प्रकार सर्वांसमोर बैठकीदरम्यानच उघडही झाला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

व्हॅलेंटायना बेट्रेस गुआडर्मा या महिला नेत्याचा झूम मिटिंगमधला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हॅलेंटायना यांनी मेक्सिकोच्या पार्लमेंटच्या एका महत्वाच्या राजकीय ऑनलाइन बैठकीला शुक्रवारी हजेरी लावली. मात्र, बऱ्याच काळापासून त्यांची स्क्रिनवर हालचाल दिसत नव्हती. खरतरं त्यांनी मिटिंगदरम्यान हजर असल्याचे दाखवण्यासाठी लॅपटॉपच्या कॅमेरॅसमोर स्वतःचा फोटो लावला होता, असं बोललं जात आहे.

झूम मिटिंग सुरु असताना काही वेळानंतर व्हॅलेंटायना आपली जागा सोडताना दिसत आहेत. यावेळी आपल्या मागे त्यांनी स्वतःचा फोटो लावल्याचेही स्पष्ट दिसत आहे. महत्वाच्या बैठकीत अशा प्रकारे खोटी हजेरी लावण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ही मोठी शऱमेची बाब ठरली आहे. डेमोक्रेटिक रिव्होल्युशन पार्टीचे उपाध्यक्ष जॉर्ज गॅविनो यांनी ही संपूर्ण झूम मिटिंग रेकॉर्ड करुन ती ट्विटरवरुन शेअर केली आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शनही दिलं असून यामध्ये ते म्हणतात, “बैठकीतील चर्चा लक्ष देऊन ऐकतानाचा तुमचा लूक हा एक फोटो असल्याचे मला कळलं, तोपर्यंत तुम्ही माझं भाषण खूपच काळजीपूर्वक ऐकत आहात, असचं मी समजत होतो.”

हा व्हिडिओ शेअर केल्यापासून त्याला ६३,००० पेक्षा अधिक व्ह्यूव्ज मिळाले असून ३०० युजर्सनी रिट्विट केला आहे. मात्र, आपल्यावरील हे आरोप व्हॅलेंटायना यांनी फेटाळून लावले आहेत. ट्विट करीत त्यांनी म्हटलं की, “चुकून माझ्या मागे माझा फोटो सेट केला गेला. डिजिटल टूल हाताळण्याचं मला जास्त ज्ञान नसल्याने माझ्याकडून ही चूक झाली. मी चुकून माझा वॉलपेपर ठेवला तो स्थिर फोटो होता. मी बैठकीदरम्यान काहीकाळ हे दुरुस्त करण्यासाठी थांबले आणि तांत्रिक मदतीची विनंतीही केली होती.”

“झूमवरील प्रत्येक मिटिंगला बोटांच्या ठशांनी हजेरी लावावी लागते. त्यामुळे बैठकीसाठी हजेरी लावणाऱ्यांची नोंद होते. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की अनेकदा माझी या व्हिडिओदरम्यान हालचाल देखील झाली आहे,” असंही व्हॅलेंटायना यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे.