रुग्णालयात एक कुटुंब डान्स करत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. करोनाची लागण झाल्याने हे कुटुंब रुग्णालयात दाखल झालं होतं. यावेळी रिपोर्ट निगेटिव्ह येताच कुटुंबाने रुग्णालयात डान्स करत आनंद साजरा केला. करोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर कुटुंबाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. मात्र त्याआधी डान्स करत त्यांनी आपल्याला मिळालेल्या या नव्या आयुष्याचा आनंद साजरा केला. डान्स करण्यासाठी त्यांनी सुशांत सिंहच्या ‘छिछोरे’ चित्रपटातील गाण्याची निवड केली होती.

व्हिडीओत कुटुंब ‘छिछोरे’ चित्रपटातील ‘चिंता कर के क्या पायेगा, मरने से पेहले मर जायेगा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ८ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाल्यानंतर एकाच कुटुंबातील १९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १५ ऑगस्ट रोजी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा रिकव्हरी रेट सध्या ७३ टक्के आहे. दुसरीकडे मध्य प्रदेशात आतापर्यंत करोनाचे ४६ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. ३५ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर चार मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली होती.