उंच पर्वत सर करणारे अनेक गिर्यारोहक आहेत. पण, ३६ वर्षांची गिगी ही यासगळ्यांहूनही वेगळी होती. कडाक्याची थंडी असो, सोसाट्याचा वारा किंवा ऊन गिगी बिकिनीमध्येच पर्वत सर करायची म्हणूनच सोशल मीडियावर ती ‘बिकिनी हायकर’ म्हणून प्रसिद्ध होती. मात्र गिगीचा थंडीनं गारठून  दुर्दैवी अंत झाला आहे. तैवानमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेली गिगी ६५ फूट खोल घळईत पडली, जखमी अवस्था आणि कडाक्याची थंडी सोसू न शकल्यानं तिचा गारठून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

गिगी ११ जानेवारीदरम्यान एकटीच तैवानमधील एका पर्वतावर गिर्यारोहणासाठी गेली होती. मात्र कड्यावरून कोसळून ती घळईत पडली. जखमी अवस्थेत असतानाही १९ जानेवारीला तिनं सॅटेलाइट फोनद्वारे अपघाताची माहिती तिच्या मित्रांना दिली. त्यानंतर गिगीला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू झाली. तीन वेळा तिचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले मात्र तिन्ही वेळा प्रयत्न करूनही एनएएससीला (नॅशनल एअरबोर्न सर्व्हिस कॉप)ला अपयश आलं. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरद्वारे सुरु असलेलं शोधकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर दोन तुकड्या तिचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आल्या.

तब्बल २८ तासांनंतर ती मृतावस्थेत बचाव पथकाला आढळली. गिगीजवळ पुरेसे उबदार कपडे नव्हते तर त्यावेळी तापमान हे २ डिग्री सेल्शिअस इतकं खाली उतरलं होतं त्यामुळे कडाक्याच्या थंडीमुळे गोठून तिचा मृत्यू झाल्याचं बचाव पथकानं सांगितलं.