भारतात जेम्स बॉण्डचे लाखो चाहते आहेत. ते वेगवेगळया मार्गाने बॉण्डबद्दल आपले प्रेम व्यक्त करतात. पण गुजरातमधल्या एका चाहत्याची गोष्टच वेगळी आहे. त्याचे नाव आशिक पटेल आहे. पेशाने ट्रान्सपोर्टर असलेल्या आशिक पटेल यांनी जेम्स बॉण्डचा कोडनेम ००७ ची नंबर प्लेट मिळवण्यासाठी चक्क लाखो रुपये मोजले. त्यांनी ज्या किंमतीला ही नंबर प्लेट मिळवली, त्याने अहमदाबाद शहरात इतिहास रचलाच. पण त्याची चर्चा संपूर्ण देशामध्ये आहे.

अलीकडेच आशिक पटेल यांनी नवीन टोयोटा फॉर्च्युनर विकत घेतली. आशिक जेम्स बॉण्डचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांना त्यांच्या नव्या कोऱ्या SUV साठी ००७ ही नंबर प्लेट हवी होती. पण आशिक यांच्याप्रमाणे इतरांनाही आपल्या कारसाठी हीच नंबर प्लेट हवी होती. SUV साठी ही नंबर प्लेट मिळवताना आशिक यांनी पैशांचा अजिबात विचार केला नाही. त्यांनी तब्बल ३४ लाख रुपये मोजून ही नंबर प्लेट मिळवली. विशेष म्हणजे नंबर प्लेट ३४ लाखाला तर कारची किंमत ३९. ५ लाख रुपये आहे. अहमदाबाद आरटीओमध्ये आतापर्यंत नंबर प्लेटसाठी इतकी मोठी रक्कम कोणीही मोजलेली नाही.

आरटीओ अधिकाऱ्यांनुसार, २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ००७ या नंबर प्लेटसाठी बोली लागायला सुरुवात झाली. सुरुवात २५ हजार रुपयापासून झाली. आशिक आणि अन्य एक वाहन चालकामध्ये जास्त किंमतीला बोली लावायची स्पर्धा सुरु झाली. काही तासात ही रक्कम २५ लाखापर्यंत पोहोचली. त्यानंतर आशिक यांनी सर्वाधिक ३४ लाखाची बोली लावून नंबर प्लेट मिळवली. आशिक यांच्या टोयोटा फॉर्च्युनरचा नंबर GJ01WA007 असेल.

पैसे भरल्यानंतर अधिकृतपणे हा नंबर आशिक पटेल यांना दिला जाईल, असे सहाय्यक आरटीओ अधिकारी एनवी परमार यांनी सांगितले. ००७ शिवाय ००१ या नंबर प्लेटला ५.५६ लाख रुपये मिळाले. ०३६९ या नंबर प्लेटसाठी एका वाहनचालकाने १.४० लाख रुपये मोजले. “नंबर प्लेट हा माझ्यासाठी पैशाचा विषय नव्हता, हा नंबर माझ्यासाठी लकी आहे” असे आशिक पटेल यांनी सांगितले.