1961 साली अमेरिकेच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रात ही ११ वर्षांची ही मुलगी या बोटीत सापडली. अटलांटिक महासागराच्या खोल पाण्यात दिशाहीन अवस्थेत ही छोटीशी नाव हिंदकळत होती. आणि त्यातल्या या लहानगीची अवस्था फार वाईट होती. अंगात जीव तर होता पण कितीतरी दिवस काही खाल्लं प्यायलं नसल्याने या  मुलीची वाचाच बसली होती. तिला हालचालही करता येत नव्हती. ही बोट सापडल्यावर या मुलीवर तातडीने उपचार करण्यात आले आणि तिचा जीव वाचला

लहानग्या टेरी जो वर उपचार करताना डाॅक्टर
लहानग्या टेरी जो वर उपचार करताना डाॅक्टर

ही मुलगी कोण कुठून आली. अटलांटिक महासागराच्या खोल पाण्यात ही नाव घेऊन ही मुलगी कशी काय भरकटली? आणि तिच्याबरोबर असलेली माणसं कुठे होती? काहीच उलगडा होईना. कितीतरी दिवसांच्या उपासाने आजारी असलेली ही मुलगी एका भयानक मानसिक धक्क्याखाली असल्यासारखं वाटत होतं. तिची दातखीळच बसली होती. तिच्यावर उपचार करत तिची योग्य काळजी घेत तिला डाॅक्टरांनी हळूहळू बोलतं केलं आणि तेव्हा या मुलीने त्यांना जे सांगितलं त्यामुळे डाॅक्टरांची दातखीळ बसायची पाळी आली

टेरी जो आपल्या कुटुंबाबरोबर
टेरी जो आपल्या कुटुंबाबरोबर

या ११ वर्षांच्या मुलीचं नाव होतं टेरी ड्युपरसाॅल्ट. काही दिवसांपूर्वीच टेरी तिचा भाऊ आणि आई-वडिलांसोबत एका समुद्रसफरीवर निघाली होती. या सफरीचं नियोदन तिचे वडील हेन्री ड्युपरसाॅल्ट यांनी व्यवस्थितपणे केलं होतं. या कुटुंबाने एक याॅट भाड्याने घेतली. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून बहामास बेटांवर आठवडाभर जाऊन यायचं आणि कुटुंबासोबत रिलॅक्स्ड वेळ घालवायचा असा प्लॅन या कुटुंबाचा होता. ही याॅट चालवण्यासाठी ड्युपरसाॅल्ट कुटुंबाने ज्युलियन हार्वे या अमेरिकन एअर फोर्सच्या माजी सैनिकाला सोबत घेतलं. सगळं काही छान होतं. या ट्रिपवर ज्युलियन हार्वेची बायकोही येणार होती.

हे सगळेजण या याॅटमधून बहामा बेटांच्या दिशेने निघाले. पुढचे काही दिवस या सर्वांसाठी स्वर्गीय अनुभवांनी भरलेले होते. बहामा बेटांआधी मधल्या काही बेटांवर, तिथल्या समुद्रकिनाऱ्यांचा आस्वाद घेत हे सगळे मजेत दिवस घालवत होते. वातावरण अतिशय स्वच्छ होतं. वादळवाऱ्याचा मागमूस नव्हता.

असंच एका रात्री डिनर झाल्यावर ११ वर्षांची छोटी टेरी डेकखाली तिच्याखाली तयार केलेल्या छोट्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. वरती डेकवर अजूनही जेवत असणाऱ्या बाकी सगळ्यांच्या हसण्याखिदळण्याचे आवाज तिला येत होते. ते एेकत टेरी झोपून गेली.

काही तास उलटले. आपल्या अंथरूणात शांतपणे झोपलेल्या टेरीची झोप एका भयानक किंकाळीने मोडली. हा तिच्या भावाचा आवाज होता. आपल्या भावाला असं ओरडताना तिने कधी एेकलंच नव्हतं. अंगावर सरसरून काटा आलेला असतानाही नक्की काय होतंय हे पहायला टेरी डेकववर आली.

त्या याॅटच्या डेकवर तिचा भाऊ आणि तिच्या आईचे मृतदेह पडले होते!

संपूर्ण डेकवर रक्ताचा चिखल झाला होता. डेकवर बाकी कोणीच दिसत नव्हतं पण या सगळ्या मृतदेहांच्या मागे उभा होता ज्युलियन हार्वे

ही याॅट चालवण्यासाठी ज्याला टेरीच्या वडिलांनी कॅप्टन म्हणून सोबत घेतलं होतं तो अमेरिकव एअर फोर्सचा माजी सैनिक ज्युलियन हार्वे हातात रक्ताने माखलेला सुरा घेऊन टेरीकडे खुनशी नजरेने पाहत होता.

“ए खाली जा चल!” हार्वे खेकसला.

तिच्या कुटुंबीयांच्या मृतदेहांनी भरलेल्या त्या डेकवरून टेरी खाली उतरत तिच्या बेडरूममध्ये परत आली. ती याॅट हळूहळू बुडत असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिच्या बेडरूममध्ये अटलांटिक महासागराचं बर्फासारखं गार पाणी हळूहळू भरत होतं.

तेवढ्यात तिला वरच्या डेकवरून पाण्यात काही पडल्याचा आवाज आला.

टेरीेने वर येऊन बघितलं तर त्या याॅटमधली एकमेव लाईफबोट समुद्रात झोकत आपला जीव वाचवत ज्युलियन हार्वे याॅटपासून दूर जात होता. काही मिनिटांमध्येच घडलेल्या या सगळ्या प्रकारांनी सुन्न झालेल्या टेरीने स्वत:ला सांभाळत बोटीवर काही मिळतं का ते पहायला सुरूवात केली.  तिच्या सुदैवाने त्या याॅटवर आणखी एक  लाईफबोट होती. हार्वेला दृष्टिआड व्हायची तिने वाट पाहिली आणि आपल्यात असला-नसलेला जोर लावत तिने ती दुसरी लाईफबोट पाण्यात ढकलली आणि त्यात स्वत:ला झोकून दिलं.

यानंतर सुरू झाला एक भयानक आठवडा. कुठल्याही अन्नपाण्याविना आणि चांगल्या कपड्यांविना आपल्या आयुष्यात नक्की काय झालं याचा भीषण अर्थ लावण्याचा  प्रयत्न करत टेरी त्या हळूहळू मोडत जाणाऱ्या बोटीत बसून राहिली. समुद्र नेईल तसे हेलकावे घेत टही बोट पुढे जात राहिली.

टेरीच्या सुदैवाने एका जहाजाला तिची ही बोट दिसली आणि या लोकांनी तिला वाचवलं. ती कुठल्या परिस्थितीतून आली हे एेकताना या डाॅक्टरांच्या अंगावर शहारे आले.

पण त्या रात्री त्या याॅटवर नक्की  झालं तरी काय होतं?

ज्युलियन हार्वे जेव्हा आपली बायको आणि ड्युपरसाॅल्ट कुटुंबीयांसोबत या सफरीवर निघाला तेव्हा त्याच्या मनात वेगळेच बेत शिजत होते. आपल्या बायकोचा खून करून तिचे विम्याचे पैसे हडपायचे असा भयानक प्लॅन मनात घेत हार्वे ही याॅट चालवत या सगळ्यांसोबत काही दिवस घालवले.

त्या एका रात्री त्याने आपल्या बायकोचा खून करण्याचं ठरवलं आणि तो केला. डिनरदरम्यान दारूचा आस्वाद घेतलेले ड्युपरसाॅल्ट कुटुंबीय आपल्याला पाहणार नाहीत असा त्याचा अंदाज होता पण हार्वेच्या बायकोचा मृतदेह ड्युपरसाॅल्ट कुटुंबीयांना दिसला आणि तिथेच त्यांचंही भविष्य निश्चित झालं.

अतिशय थंड डोक्याने या सगळ्यांना संपवत ती याॅट बुडेल अशी व्यवस्था करत हार्वे लाईफबोट घेत निसटला. ११ वर्षांची टेरी करून करून काय करणार? ती याॅट बुडाल्यावर ती मरणारच अाहे असा विचार त्याने करत तिला स्वत: ठार केलं नाही. आपल्या सैनिकी शिक्षणाचा वापर करत त्याने स्वत:ची लाईफबोट किनाऱ्याला लावली आणि खोट्या गोष्टी रचत या प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. पण टेरीचा जीव बचावल्याचं आणि त्याने आपल्याविषयी पोलिसांना सगळं काही सांगितल्याचं त्याला कळलं आमि आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने आत्महत्या केली.

हसतमुख पण खुनशी ज्युलियन हार्वे (छाया सौजन्य- लाईफ डेली)
हसतमुख पण खुनशी ज्युलियन हार्वे (छाया सौजन्य- लाईफ डेली)

आज टेरी ६१ वर्षांची आहे. वयाच्या ११ व्या वर्षी तिच्यावर आलेल्या या भयानक मोठ्या संकटातून पुढे जात तिने आपलं आयुष्य पुन्हा उभारलं. पण आजही तिला ते सगळे दिवस लख्खपणे आठवतात. एका छान समुद्रसफरीतून आपल्या कुटुंबासोबत मजेत वेळ घालवायचा या माफक उद्देशाने सुरू झालेली ही सहल टेरीचं जीवनच बदलून टाकणारी ठरली.

आज या सगळ्यातून टेरी बाहेर आली आहे. नाही म्हणायला आपल्या आधीच्या आयुष्यातला तो दुखरा भाग कापून टाकण्यासाठी तिने आपलं नाव ‘टेरी’ वरून ‘टेरे’ केलंय. आयुष्य सुरू आहे, पुढे जातच आहे. पण आता ते त्या होडीसारखं दिशाहीन भटकत नाहीये.

टेरी जो एका टीव्ही शोमध्ये आपला थरारक अनुभव कथन करताना ( छाया सौजन्य: लाईफ
टेरी जो एका टीव्ही शोमध्ये आपला थरारक अनुभव कथन करताना ( छाया सौजन्य: लाईफ)