नवी दिल्ली : शाळेत विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या स्वत:च्या मुलीला शिस्तीचा धडा शिकवण्यासाठी वडिलांनी नामी शक्कल लढविली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर बघणाऱ्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.

अमेरिकेतील ओहियो शहरात राहणाऱ्या मॅट याची दहा वर्षीय मुलगी क्रिस्टन ही खोडकर स्वभावाची आहे. ती सतत वर्गातील मित्रांना त्रास देत असते. त्यामुळे तिचे मित्रही तिच्याविषयी वारंवार तक्रारी तिचे वडील म्हणजे मॅट यांच्याकडे करीत असतात. क्रिस्टनला तिच्या अशा वागण्यामुळे शाळेने तीन दिवसांसाठी शाळेतून काढून टाकले होते. मुलगी क्रिस्टनच्या अशा भांडखोर वागण्यामुळे वडील मॅट कंटाळले होते. क्रिस्टनने इतरांशी चांगले वागावे आणि शिस्त लागावी यासाठी त्यांनी शक्कल लढविली. आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळेत त्यांनी क्रिस्टनला पायीच पाठविले.

याचा व्हिडिओ मॅट यांनी तयार केला असून त्यात ते काही बोलतानाही दिसत आहेत. आज माझी मुलगी ३५ अंश सेल्सिअस तापमानात शाळेत पायी जात असल्याचे त्यांनी व्हिडिओ शेअर करताना म्हटल आहे. दरम्यान, या व्हिडिओवरून चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मॅट याच वागण निर्दयी असल्याचे काहीजण म्हणालेत. तर हे अमानवीय कृती असल्याची टीका काहींनी केली आहे.

मात्र, मॅटनी तयार केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत १९ मिलियन व्ह्यूज मिळाले असून, तीन लाख नव्वद हजार लोकांनी तो शेअर केला आहे.