संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून राहिलेल्या ‘चांद्रयान-२’चे गेल्या आठवड्यात भारताने यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर इस्रो आणि टीमचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख आणि चांद्रयान २ मिशनचे नेतृत्व करणारे डॉ. कैलासावडिवू सिवन यांची सध्या एक मुलाखत चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या खडतर प्रवासाविषयी सांगितले आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा इस्रोच्या प्रमुखपदी कसा जातो. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास या मुलाखतीतून समोर आला आहे.

तामिळनाडूमधील सराक्कलविलाई या छोट्याशा गावांतील एका शेतकऱ्यांच्या घरात डॉ. कैलासावडिवू सिवन यांचा जन्म झाला होता. आज ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख म्हणून काम पाहतात. चांद्रयान २ सिवन यांच्या नेतृत्वात नुकतेच आकाशात झेपावलेय. सिवन यांचे प्राथमिक शिक्षण एका सरकारी शाळेत झाले आहे. नागरकोयलमधील एसटी हिंदू कॉलेजमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९८० मध्ये मद्रास इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(एमआयटी)मधून एयरोनॉटिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलं. २००६ मध्ये आयआयटी मुंबईमधून एयरोस्पेस इंजीनिअरिंगमधून डॉक्टरेट घेतली. पदवी घेणारे कैलासावडिवू आपल्या परिवारातील पहिलेच सदस्य आहेत. त्यांचे भाऊ आणि बहिण यांना घरच्या हालाकिच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही.

मुलाखतीदरम्यान कैलासावडिवू म्हणाले की, ‘ज्यावेळी मी महाविद्यालयात शिक्षण घेताना शेतांंमध्ये वडिलांना मदत करत होतो. त्यामुळेच वडिलांनी मला गावाजवळील शाळेत शिक्षणासाठी टाकले होते. शिक्षण घेत वडिलांना शेतात मदत करत होतो. ज्यावेळी बीएस(गणित)मध्ये १०० टक्के घेऊन पदवी पास केली, तेव्हा माझ्या वडिलांचा विचार बदलला. लहानपणी माझ्या पायात कधीही चप्पल किंवा सँडेल नव्हता. महाविद्यालयापर्यंत धोतर घालून वर्गात जात होतो. ज्यावेळी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मी पहिल्यांदाच पँट घातली.’

कैलासावडिवू सिवन यांनी १९८२ मध्ये इस्रोमध्ये रूजू झाले. इस्रोमध्ये त्यांनी प्रत्येक रॉकेट कार्यक्रमात काम केलं आहे. जानेवारी २०१८ मध्ये सिवन यांच्याकडे इस्रोच्या प्रमुखपदाची सुत्रे सोपवण्यात आली. त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर(व्हीएसएससी)मध्ये निर्देशक म्हणूनही काम पाहिलं आहे. सिवन यांनी सायक्रोजेनिक इंजन, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि रियूसेबल लॉन्च व्हीकल या कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली आहे. सिवन यांना इस्रोचा रॉकेट मॅन म्हणूनही ओळखलं जातं.

१५ फेब्रुवारी २०१७ मध्ये इस्रोने १०४ उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवान यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सिवान यांनी इस्रोच्या अग्निबाणांच्या मार्गाचे सादृश्यीकरण करणाऱ्या सितारा या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. सिवन यांना फावल्या वेळेत तामिळ क्लासिक गाणी ऐकण्याचा छंद आहे. सिवन यांचा आवडता चित्रपट राजेश खान्ना यांचा आराधना हा आहे.

सत्यभामा विद्यापीठाची मानद डॉक्टरेट, विक्रम साराभाई पुरस्कार, बिरेन रॉय अवकाश विज्ञान पुरस्कार असे अनेक मानसन्मान सिवान यांना मिळाले आहेत.