Happy Father’s Day 2019 भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने दहा जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. यावेळी युवराजनं वडिलांप्रति आपली भावनाही व्यक्त केली. युवराज आणि वडिल योगराज यांचं नाते पहिल्यापासूनच खास राहिले आहे. योगराज सिंह यांच्यामुळेच भारताला अष्टपैलू आणि लढवय्या खेळाडू मिळाला. मुलगा ज्यावेळी मोठा होत असतो, त्यावेळी त्याला आपला मित्र बनवायचे असते. ‘मी लहानपणापासूनच युवराजला आपला मित्र केलं होतं, असे योगराज सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.’ १६ जून रोजी फादर्स डे आहे. त्या निमित्ताने युवराज आणि योगराज या पितापुत्रांची खास स्टोरी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.

पहिल्यापासूनच युवराज आणि योगराज यांच्यात मैत्रीचे नातं आहे. योगराज यांनी भारतीय संघासाठी क्रिकेट खेळले आहे. मात्र, दुखापतीमुळे १९८१ मध्ये त्यांना क्रिकेटला रामराम ठोकावा लागला. १९८३ मध्ये विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचं स्वप्न धुळीस मिळाले होते. मात्र, त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलानं भारताकडून क्रिकेट खेळावं आणि विश्वचषक जिंकून द्यावा, ही जिद्द पकडली. तशी त्यांनी युवराजकडून तयारीही करून घेतली. दहा वर्षाचा असताना युवराजला क्रिकेटचं नव्हे तर स्केटिंगचे वेड होते. यामध्ये त्यानं सुवर्णपदकही पटकावलं होते. मात्र, वेळीच योगराज यांनी युवराजला स्केटिंगऐवजी क्रिकेटकडे लक्ष द्यायला सांगितले आणि भारतीय संघाला ‘युवराज’ मिळाला.

योगराज यांचा स्वभाव अतिशय रोखठोख तर आहेच, शिवाय ते कडक शिस्तीचेही आहेत. लहानपणीच त्यांनी युवराजमधील खेळाडूला ओळखलं होते. तेव्हापासून त्यांनी त्याला क्रिकेटचे धडे देण्यास सुरूवात केली. शाळेत असताना युवी सकाळी क्रिकेटच्या मैदानात सरावासाठी जायचा आणि रात्री घरी परतायचा. लहान वयात युवराजला क्रिकेट खेळायला लावल्यामुळे पाहुणे आणि घरच्यांनीही योगराज यांना टोमणे मारले. युवराजच्या आजीनं तर अनेकदा योगराज यांना शिव्याही दिल्या, भांडल्याही मात्र त्यांची जिद्द तुटली नाही. घरच्या आणि बाहेरच्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत योगराज यांनी वडिलांचे कर्तव्य पार पाडलं आणि युवराजला परिपूर्ण क्रिकेटर करून दाखवलं.

सोमवारी दहा जून रोजी निवृत्ती स्वीकारल्यानंतर युवीने वडिलांचे यासाठी आभार मानले. माझ्या वडिलांनी मला पाठिंबा दिला, मला मार्गदर्शन केले. १९८३ मधील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघात स्थान न मिळाल्याची खंत त्यांना वाटायची. पण २०११ मधील विश्वविजेत्या भारतीय संघात माझा समावेश होता, याचा त्यांना आनंद होता. माझ्या क्रिकेटमधील कारकिर्दीविषयी ते समाधानी आहेत, अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी युवराजनं दिली.

अंडर १९ विश्वचषकामध्ये मालिकावीर पुरस्कार मिळाल्यानंतर योगराज यांनी युवराजला दुचाकी भेट दिली होती. त्यानंतर भारतीय संघाकडून खेळल्यानंतर युवराजकडे अनेक महागड्या गाड्या आल्या. मात्र, वडिलांनी भेट दिलेली पहिली गाडी अद्याप त्याच्याकडे आहे. युवराज आणि योगराज यांच्यातील प्रेम, मैत्री आणि लढाऊपणा आज अनेकांसाठी आदर्श आहे.