एका एफबीआय एजंटला डान्स करण्याची हौस चांगलीच महागात पडली आहे. २९ वर्षीय एफबीआय एजंट चेस बिशप नाईट क्लबमध्ये डान्स करत होता. डान्स करण्याच्या नादात त्याच्या खिशातून बंदुक खाली पडली. ती उचलण्याच्या खटाटोपीत पिस्तुलमधून गोळी सुटली. ही गोळी क्लबमध्ये असलेल्या एका व्यक्तीला लागली. या हलगर्जीपणामुळे एफबीआय एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला आज (१३ जून) रोजी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

डेन्वर नाइट क्लबमध्ये चेस गेला होता. इतकंच नाही तर जमलेल्यांना प्रभावित करण्यासाठी त्यानं डान्सही केली. क्लबमध्ये त्यावेळी उपस्थित असलेली तरूणमंडळी चेसला प्रोत्साहन देत होते. बॅकफ्लिप करण्याच्या नादात चेसनं खिशात लपवून ठेवलेली बंदुक खाली पडली. कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून त्यानं ती पटकन उचलण्याचा प्रयत्न केला पण या नादात त्याच्या हातून चुकून गोळी सुटली आणि एका तरुणाच्या पायाला लागली. यात तरुण थोडक्यात वाचला असला तरी चेस मात्र चांगालाच अडचणीत सापडला आहे.

मंगळवारी हा प्रसंग घडल्यानंतर त्यानं स्वत: पोलिसांसमोर आत्मसर्मपण केलं आहे. त्याच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे.