झारखंडमधील एका महाविद्यालयातील शिक्षकांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. आता त्यांनी अशी कोणती पोस्ट टाकली की ज्यामुळे त्यांना थेट आपली नोकरीच गमवावी लागली? तर या शिक्षकांनी काही महिन्यांपूर्वी आपण आपल्या मित्रमंडळींसाठी बीफ पार्टीचे आयोजन करु इच्छितो असे आपल्या फेसबुक वॉलवर लिहीले होते.

या शिक्षकांचे नाव आहे जीतराय हंसदा. फेसबुकवरील त्यांच्या पोस्टवरुन त्यांना महाविद्यालयाने कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानुसार त्यांनी याला उत्तरही दिले. मात्र महाविद्यालय प्रशासनाचे या उत्तराने समाधान न झाल्याने महाविद्यालयाने या शिक्षकांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या शिक्षकांचा महाविद्यालयाशी असणारा करार काही दिवसांतच संपणार होता. त्यामुळे फेसबुकच्या घटनेवरुन महाविद्यालयाने त्यांचा पुढील वर्षासाठीचा करार वाढविण्यास असंमती दर्शविली.

केंद्र सरकारतर्फे गोहत्या करण्यास प्रतिबंध असूनही एका शिक्षकाने आपल्या सोशल मीडियावर अशाप्रकारे पोस्ट लिहील्याने त्यांना नोकरीवरुन काढण्यात आल्याचे महाविद्यालयाने स्पष्ट केले. काही विद्यार्थी संघटनांनी हंसदा यांच्या फेसबुक पोस्टवरुन त्यांना महाविद्यालयातून काढून टाकावे अशी मागणी केली होती. मात्र महाविद्यालय प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे हंसदा यांचे म्हणणे आहे. याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.