जगात सतत वेगवेगळ्या गोष्टींचा लिलाव होत असतो आणि त्या वस्तूंवर कोट्यवधींची बोली लागत असते. कॅलिफोर्नियामध्ये नुकताच एक असाच मोठा लिलाव झाला आहे. वेगासाठी प्रसिद्ध असणाऱ्या फरारीवर जगातील कारची सर्वात मोठी बोली लागली. Ferrari 250 GTO नावाच्या गाडीच्या १९६२ च्या मॉडेलचा लिलाव करण्यात आला आहे. या गाडीच्या लिलावाची किंमत ऐकून तुम्ही अक्षरश: थक्क व्हाल. या Ferrari 250 GTO वर तब्बल ३४१ कोटींहून अधिक किमतीची बोली लागली आहे. इतकी मोठी किंमत मिळाल्याने या लिलावाने वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे.

याआधी २०१४ मध्ये एका कारचा सर्वात महागडा लिलाव झाला होता. मात्र ती बोली मागे टाकत Ferrari GTO ने वर्ल्ड रेकॉर्ड मोडले आहे. सर्वात साधी आणि तरीही चांगली दिसणारी कार असल्याने यावर इतकी बोली लागली. तसेच ही कार रेसिंग कारच्या यादीतील उत्तम कार म्हणूनही ओळखली जाते. ही कार १९६२ मध्ये इटालियन GT स्पर्धा जिंकली होती. याबरोबरच या कारने १९६२ ते १९६५ या कालावधीतील जवळपास १५ रेसिंग स्पर्धा जिंकल्या आहेत. अमेरिकेतील पहिले वर्ल्ड रेसिंग चॅम्पियन फिल हिल यांनी फॉर्म्युला वनमध्ये ही गाडी चालवली आहे.

आता ही कार इतक्या मोठ्या किमतीला कोणी विकत घेतली असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर मागील १८ वर्षांपासून मायक्रोसॉफ्टसाठी काम करणाऱ्या डॉ. ग्रेग व्हिटन यांनी या कारवर ३४१ कोटींहून अधिक किमतीची बोली लावली आहे. यांनीच मायक्रोसॉफ्टची वेगवेगळी अॅप्लिकेशन्स निर्माण केली होती. त्यामुळे या व्यक्तीकडे किती संपत्ती असेल याची कल्पनाच न केलेली बरी.