सध्या जिथे तिथे फुटबॉलचा फिव्हर पाहायला मिळत आहे. आपल्या आवडत्या संघाला, खेळाडूला पाठिंबा देण्यासाठी जगभरातले चाहते रशियात जमले आहेत. फुटबॉलचा हा भव्य सोहळा पाहण्यासाठी चाहते जगभरातून येथे आले आहे. यातल्या काही चाहत्यांचं फुटबॉल प्रेम तर पराकोटीचं आहे. सध्या या चाहत्यांमध्ये मेक्सिकोमधून आलेला मित्र मैत्रिणींचा एक गट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या गटात एक व्यक्ती गैरहजर आहे. त्यामुळे त्याच्या मित्र-मैत्रिणींनी आपल्या गैरहजर मित्राची कमतरता भासू नये यासाठी त्याचा फोटो असलेला मोठा कटआऊट रशियात आणला आहे. हा गट जिथे जिथे जातो तिथे न विसरता आपल्या मित्राचा कटआऊट घेऊन जातात.

FIFA World Cup 2018 : पंधरा लाखांचं कर्ज घेऊन भारतीय फुटबॉलप्रेमीनं सामना पाहण्यासाठी बांधलं स्टेडिअम

जॅव्हिअर असं या मित्राचं नाव असून त्याच्या बायकोनं त्याला मित्रांसोबत रशियाला जाण्याची परवानगी नाकारली. जॅव्हिअरच्या बायकोनं परवानगी नाकारल्यानंतर जॅव्हिरचे मित्र- मैत्रिणी नाराज झाले. २०१४ पासून ते रशियात फिफा वर्ल्ड कप पाहायला जाण्याची तयारी करत होते. पैसे जमवण्यासही त्यांनी सुरूवात केली होती. पण ऐनवेळी जॅव्हिअरनं बायकोमुळे माघार घेतली. अखेर त्याच्या मित्र- मैत्रिणींनी जॅव्हिअरचं मोठ कटआऊट तयार केलं. आता त्याचा ग्रुप जिथे जातो तिथे हे कटआऊट ते सोबत घेऊन जातात.

इतकंच नाही तर जॅव्हिअरच्या नावानं त्यांनी फेसबुक पेजही तयार केलं आहे. त्यामुळे जॅव्हिअर मेक्सिको असला तरी त्याची चर्चा मात्र रशियात होत आहे.