‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये जपानी संघांचं भविष्य सांगणारा ऑक्टोपस रॅबिऑटला अखेर मारून टाकण्यात आलं आहे. जपान विरुद्ध बेल्जिअम असा सामना रंगण्यापूर्वीच रॅबिऑटचा मालक किमिओ आबे यांनं त्याची विक्री केली. ऑक्टोपसला जिवंत ठेवून स्वत:चं आर्थिक नुकसान करण्यापेक्षा त्याच्या मालकानं त्याला विकून टाकणं पसंत केलं.

‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये जपानी फुटबॉल संघ कोणते सामने जिंकणार आणि कोणते सामने हरणार याचा अचूक अंदाज रॅबिऑटनं बांधला होता. त्यामुळे भविष्य सांगणारा हा ऑक्टोपस गेल्या काही दिवसांत फुटबॉलपटूंइतकाच प्रसिद्ध झाला होता. प्रत्येक सामन्याआधी रॅबिऑट काय भविष्य सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असायचं. मात्र या ‘ज्योतिष’ ऑक्टोपसचा अंत झाला आहे. त्याच्यापासून सशिमी हा जपानी पदार्थ तयार करण्यात आला आहे.

मच्छिमार किमिओ आबेनं त्याला काही महिन्यांपूर्वी पकडलं होतं. ‘जपानी संघाचं रॅबिऑटनं अचूक भविष्य सांगितलं, याचा मला खूपच आनंद झाला. मी यापुढे जो ऑक्टोपस पकडेन तोही योग्य भविष्य सांगेन’ असं आबे म्हणाले. मात्र या ऑक्टोपसला ठेवून आर्थिक नुकसान करायचं नव्हतं म्हणून त्याची विक्री करण्यात आली.