फिलीपीन्समध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका कोंबड्याने पोलीस अधिकाऱ्याचा जीव घेतल्याचा प्रकार एका पोलीस कारवाईदरम्यान घडला आहे. बेकायदेशीरपणे कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या एका ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यादरम्यान एका कोंबड्याने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान या पोलिसाचा मृत्यू झाला. ज्या कोंबड्याने पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला तो झुंज लढणारा कोंबडा असल्याने त्याच्या पायाला ब्लेडची कड काढून बनवण्यात आलेले काटे बांधण्यात आले होते. याचमुळे पोलीस अधिकाऱ्याच्या पायाची नस कापली गेली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. लेफ्टनंट क्रिस्चियन बोलोक असं मरण पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

या घटनेसंदर्भात नॉर्दन समरचे पोलीस प्रमुख कर्नल अर्नेल अपुड यांनी सविस्तर माहिती दिल्याचे ‘डेली मेल’ने म्हटलं आहे. झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या कोंबड्याच्या पायाला लावण्यात आलेला एक काटा बोलोक यांच्या डाव्या पायाच्या पोटरीतील नसेमध्ये अडकला आणि नस कापली गेली. यामुळे पोलीस अधिकाऱ्याच्या मांडीजवळ मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाला. पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयात घेऊन जातानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. फिलीपीन्समध्ये कोंबड्यांच्या लढाईला तुपडा असं म्हटलं जातं. स्थानिकांमध्ये हा खेळ खूप लोकप्रिय आहे. या खेळावर लोकं बेकायदेशीपणे पैसा लावतात.

फिलीपीन्समध्ये कोंबड्यांच्या लढाईसाठी त्यांच्या पायाला ब्लेडपासून तयार करण्यात आलेले विशेष काटे बांधण्यात येतात. या काट्यांना गाफ असं म्हटलं जातं. कोंबड्यांची झुंज लावली जाते तेव्हा ती दोन पैकी एका कोंबड्याचा मृत्यू होईपर्यंत सुरु ठेवली जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर इतर अनेक खेळांप्रमाणे यावरही बंदी घालण्यात आली आहे. याच कोंबड्यामुळे एखाद्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू होणे दुर्देवी असल्याचे मत अपुड यांनी व्यक्त केलं आहे. पहिल्यांदा मला या घटनेबद्दल समजलं तेव्हा मला विश्वासच बसला आहे. मी २५ वर्षांपासून पोलीस दलाच्या सेवेत आहे मात्र या पूर्वी मी अशा दुर्घटनेबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मी माझ्या एका सहकार्याला कोंबड्यांच्या झुंजीमध्ये गमावलं, अशा शब्दांमध्ये अपुड यांनी शोक व्यक्त केला आहे.

सॅन जोसे शहरामध्ये टाकण्यात आलेल्या या छाप्यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन कोंबडे जप्त करण्यात आलेत.