तैवानमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका व्यक्तीला चक्क अडीच लाखांचा (साडेतीन हजार डॉलर म्हणजेच दोन लाख ५७ हजार ९७६ रुपये) दंड ठोठावण्यात आला आहे. बरं एवढा मोठा दंड ठोठावण्यामागील कारण म्हणजे या व्यक्तीने त्याला क्वारंटाइन केलेल्या हॉटेल रुमच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि ते ही केवळ आठ सेकंदांसाठी. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार काओहुसीउंग शहराच्या दक्षिणेकडे असणाऱ्या बेटावर हा प्रकार घडला. फिलिपिन्सवरुन आलेल्या या कामगाराला तैवानममधील करोना निर्बंधांनुसार क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र तो आपल्या हॉटेल रुममधून बाहेर लॉबीमध्ये डोकावल्याचे सीसीटीव्हीमध्ये पायला मिळालं आणि नियम तोडल्याबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला.

क्वारंटाइन करण्यात आलेली व्यक्ती रुमच्या बाहेर निघाल्याचं हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना सीसीटीव्हीमध्ये दिसलं. त्यानंतर त्यांनी तातडीने तैवानच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून यासंदर्भातील माहिती दिली. या व्हिडीओमध्ये पुढे ही व्यक्ती त्याच्यासोबतच क्वारंटाइन करुन दुसऱ्या रुममध्ये असणाऱ्या मित्राशी काहीतरी बोलत होती. या व्यक्तीने दोन रुममध्ये असणाऱ्या टेबलवर काहीतरी ठेवलं. त्यासाठीच त्याने आपला पाय रुमच्या बाहेर काढला होता. आपल्या मित्राला कोणतीतरी गोष्ट देण्यासाठी ही व्यक्ती बाहेर आल्याचे व्हिडीओवरुन स्पष्ट होत होतं.

तैवानमध्ये करोनासंदर्भातील नियम काटेकोरपणे पाळले जातात. त्यामुळेच जगभरामध्ये करोनाचा फैलाव होत असतानाच ज्या चीनमधून करोनाचा जगभर प्रदुर्भाव झाला त्या अवाढव्य चीनच्या बाजूला असणाऱ्या तैवानसारख्या छोट्या देशाने करोनाशी यशस्वीपणे झुंज दिली. करोनाविरुद्धच्या तैवानच्या लढ्याचे जगभरातून कौतुकही झालं आहे. परदेशातून तैवानमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जातं. या कालावधीमध्ये क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीने सर्वच्या सर्व १४ दिवस सोय करण्यात आलेल्या हॉटेल रुममध्येच राहणे अपेक्षित असते. या व्यक्तींच्या रुमवरील मुख्य दरवाजांवर २४ तास सीसीटीव्ही कॅमेरांची नजर असते. १४ दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही. त्यांच्या जेवणाची आणि इतर आवश्यक वस्तुही त्यांच्या रुमच्या दाराजवळच त्यांना उपलब्ध करुन दिल्या जातात.

करोनासंदर्भातील निर्बंधांनुसार नियम मोडणाऱ्यांना तैवान सरकारच्या आरोग्य खात्याने मोठा दंड ठोठवण्याची तरतूद केली आहे. त्यामुळेच इथे करोनासंदर्भातील नियम जास्त कटाक्षाने पाळले जातात.