मुंबई पोलिसांचा जनजागृती करणारी सोशल मीडिया हँडल्सवरील हटके कन्टेंट नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. करोनाविषयी जागरुकता असो किंवा कोणताही दिनविशेष मुंबई पोलिसांच सोशल मीडिया हँडल्स नेहमीच व्यक्त होत लोकांना काही तरी संदेश देतं. मुंबई पोलिसांच्या या सोशल मीडियावरील यशामागे आहेत संचिका पांडे.

संचिका पांडे हॅट मीडिया ही संस्था चालवतात, जी मुंबई पोलीस आणि मुंबई महानगर पालिकेचा सोशल मीडिया हाताळतात. एकेकाळी क्राईम रिपोर्टर असणाऱ्या संचिका कधी या क्षेत्रात येतील याची कल्पनाही कोणालाही नव्हती. पोलिसांविषयी असलेली भीती कमी करण्याचा आणि आणि अधिक मजेशीर बनविण्याचे श्रेय संचिका यांना देता येऊ शकते.

“पोलीस विभाग हा या क्षेत्रातही अधिक कार्यक्षम आहे. कधीकधी सर्जनशील लेखन करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाचाही खूप सक्रिय भाग घेतात. कन्टेंट तयार करताना प्रोटोकॉलचे पालन करण्यासंदर्भात ते नेहमी सूचना देत असतात. ते या प्रणालीचे मुख्य भाग आहेत,” असे संचिका यांनी सांगितले.

“गेल्या काही वर्षांत विशिष्ट मोहीम असो किंवा दररोजच्या प्रश्नांची उत्तरे देणं असो मुंबई पोलिसांच्या ट्विटर खात्याने अशा प्रकारे समस्या सोडवण्यावर नेहमीच भर दिला आहे. ज्यामुळे ते खूप लोकप्रिय झाले आहेत. पोलिसांबद्दलच्या ठरलेल्या मतांमुळे कोणत्याही पोलीस खात्याने यापूर्वी असे काम केले नाही. आधीपासून पोलिस अधिकाऱ्यांची भीती वाटत आलीय आणि आता ते बदलण्याची वेळ आली आहे,” असे पांडे यांचे मत आहे.

मुंबई पोलिसांच्या ट्विटमध्ये कन्टेंट हा मोठ्या प्रमाणात  तरुणाईतून येणारा आहे. टेलर स्विफ्ट आणि जॉन लीजेंडपासून ते ‘मनी हाईस्ट’ आणि ‘पीकी ब्लाइंडर्स’ पर्यंत बर्‍याच टीव्हीवरील कार्यक्रमांचा, संगीत आणि सिनेमांचा आपल्या क्रिएटिव्ह्जमध्ये उपयोग केला जातो. तरुणाईला याची भूरळ पडते आहे. ट्विटर मॅडम या नावाने लोकप्रिय असलेल्या पांडे म्हणतात की, पोलिस विभाग नेहमीच तरुणांना प्रोत्साहित करण्यास उत्सुक असतो. तरुणाईने कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थेचे महत्त्व समजून घ्यावे आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे का आहे हे समजून घ्यावे, अशी संचिता यांची इच्छा आहे.

तरुण पोलिस उपायुक्त आणि आयपीएस अधिकाऱ्यांना नेटफ्लिक्स पाहणेही आवडते आणि सोशल मीडियामध्ये चालू असलेल्या ट्रेंडविषयीसुद्धा त्यांना माहिती असते. ते नेहमी आम्हाला ट्रेंड पाठवतात. कधीकधी ते इतर कोणत्याही पोलीस विभागाने केलेला प्रयोगाची देखील माहिती देत असतात. ते त्यांच्या भागात काय घडत आहे याचा मागोवा देखील घेत असतात आणि त्याबदद्ल आम्हाला कळवतात” असे संचिता यांनी सांगितले.