पोपटाला बोलताना ऐकायला भारीच गंमत वाटते पण, हाच पोपट बोलताना शिव्या देऊ लागला तर? असाच काहीसा प्रकार घडलाय पोपटाला वाचवायला गेलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासोबत.

लंडनमधल्या कुक्कू हॉल परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा मकाऊ पोपट गेल्या तीन दिवसांपासून छतावर अडकला होता. या पोपटाला नीट उडता येत नसल्यानं तो तिथेच बराच काळ अडकून होता. अखेर या पोपटाच्या काळजीनं ग्रासलेल्या मालकानं प्राणीप्रेमी संस्थेकडे मदत मागितली, काही अवधितच छतावर अडकलेल्या पोपटाला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले.

शिडी लावून एक अधिकारी छतावर चढला. मात्र पोपटाच्या मदतीसाठी गेलेल्या या अधिकाऱ्याला त्याची पोपटपंची ऐकून धक्काच बसला. पोपटाजवळ गेल्यानंतर सतत i love you हे वाक्य त्याला ऐकवा आणि जवळ करा अशी सूचना पोपटाच्या मालकानं केली. या सूचनेप्रमाणे अधिकारी वागत होता मात्र वारंवार हा पोपट या अधिकाऱ्याला शिवी देत होता… ती शिवी सुद्धा F**K O** ही. त्या अधिकाऱ्याला ही पोपटपंची ऐकून इतका धक्का बसला की त्यानं घडलेला प्रकार वरीष्ठांना सांगितला.

एखादा पक्षी अशा प्रकारे शिव्यांची लाखोली वाहतोय हे ऐकून धक्का बसला. मात्र त्याला वाचवणं आमचं कर्तव्य होतं, असं सांगत या पोपटपंचीकडे अधिकाऱ्यानं दुर्लक्ष केलं. माणसांच्या सानिध्यात राहून कुठल्या शिव्यांचा काय अर्थ आहे याचा गंध नसणारे प्राणी माणसाची बोली उचलतात आणि त्याची परतफेड अशी करतात हे मात्र या निमित्तानं समोर आलं आहे.