अमेरिकन रिटेल कंपनी वॉलमार्टनं फ्लिपकार्ट ही भारतीय ई-कॉमर्स कंपनी खरेदी केली. भारतीय मूल्याप्रमाणे १.०७ लाख कोटी रुपयांमध्ये झालेला हा व्यवहार एकूणच भारतीय व्यवसायातीलही चालू वर्षांतील आतापर्यंतचा सर्वांत मोठा व्यवहार ठरला आहे. या व्यवहारानंतर सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी कंपनीला सोडचिठ्ठी देत एक भावनिक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. ‘माझं इथलं काम संपलं आहे. आता १० वर्षांनंतर ही ज्योत दुसऱ्याच्या हातात देऊन फ्लिपकार्टमधून निघून जाण्याची वेळ आली आहे’ असं सचिन बन्सल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे.

वॉलमार्टनं सर्वाधिक रक्कम मोजून बुधवारी या कंपनीचा ७७ % हिस्सा आपल्या ताब्यात घेतला. गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्ट खरेदी करण्यासाठी वॉलमार्ट आणि अॅमेझॉन या दोन्ही कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू होती. हा व्यवहार पार पाडल्यानंतर सचिन बन्सल यांनी आपला ५.५ % हिस्सा विकत निर्गमन केला. या व्यवहारानंतर सचिन यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली. ‘ फ्लिपकार्टनं नेहमीच ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या गरजा लक्षात ठेवून त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. मला सर्वोत्तम लोकांसमवेत काम करण्याची संधी मिळाली. अनेकदा भारतीयांच्या खूप मोठ्या आणि किचकट समस्या सोडवल्या. पण सांगायला दु:ख होतंय की आता माझं इथलं काम संपलं आहे. १० वर्षांनंतर आता ही ज्योत दुसऱ्यांच्या हाती सोपवण्याची आणि फ्लिपकार्टमधून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पण मी बाहेरून तुमच्यावर लक्ष ठेवेन आणि तुम्हाला प्रोत्साहन देईन. तुम्ही चांगलं काम कराल अशी मला आशा आहे. आता मी दीर्घ सुट्टीवर चाललो आहे. गेल्या कित्येक वर्षांत काही लोकांना मी वेळ देऊ शकलो नाही आता त्यांना वेळ देणार आहे.’ असं लिहित सचिन यांनी आपल्या सहकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.