अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कर्जाचा दावा करत एका व्यक्तीने रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड केली आहे. आश्चर्यचकित करणारी ही घटना फ्लोरिडा येथे घडली आहे. यात तब्बल ३० हजार अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे. खळखट्याक करणाऱ्या या ३० वर्षीय गुन्हेगाराचे नाव ‘जस्टिन जेम्स विल्सन’ असे आहे. रस्त्यावर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या जस्टिनने एकून २० गाड्यांचे नुकसान केले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला अटक केली आहे.

त्याने पोलीस चौकशी दरम्यान गुन्हा मान्य केला. परंतु याबाबत त्याने दिलेले कारण मात्र चक्रावून टाकणारे आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्याकडून तब्बल एक ट्रिलीयन डॉलरचे ( ७११ कोटी ९७ लाख रुपये ) कर्ज घेतले होते. अनेक प्रयत्न करुनही त्यांनी ते कर्ज परत केले नाही. परिणामी आर्थिक टंचाईमुळे तो बेघर झाला. शेवटी या घटनेचा बदला घेण्यासाठी त्याने या गाड्या फोडल्या. असा दावा जेम्सने केला आहे.

जेम्सने केलेला दावा पोलिसांसाठी हास्यास्पद असला, तरी देखील या प्रकारामुळे ते चांगलेच कचाट्यात अडकले आहेत. जेम्स अत्यंत गरीब व अनाथ आहे. दोन वेळच्या जेवणासाठी त्याला रस्त्यावर भीक मागावी लागते. अशा परिस्थीत त्याने २० लाख रुपयांचे नुकसान केले. गाड्यांच्या मालकांना त्यांच्या नुकसानीची भरपाई हवी आहे. दरम्यान विमा कंपन्यांनी देखील अशा प्रकारची भरपाई त्यांच्या नियमात बसत नसल्यामुळे पैसे देण्यास नकार दिला आहे. अशा परिस्थीत गाड्यांच्या मालकांना नुकसान भरपाई द्यायची कशी हा पेच पोलिसांसमोर पडलेला आहे.