लग्न म्हटल्यावर अनेक गोष्टी आल्या. त्यातही आता लग्नाआधी प्री-वेडिंग शूट करण्याचा ट्रेण्ड वाढलेला दिसत आहे. मात्र असे प्री-वेडिंग शूट करणे राजस्थान पोलीस खात्यामध्ये असणाऱ्या वरिष्ठ निरिक्षक असणाऱ्या धनपत सिंह यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्री-वेडिंग शूटमध्ये लाच घेण्याची कृती करतानाचे काही दृष्ये धनपत यांनी आपल्या होणाऱ्या पत्नी किरणबरोबर शूट केले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाले असून यावरुन आता पोलीस खात्यावर टीका होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस महानिरीक्षक हवा सिंह घुमरिया (कायदा) चांगलेच संतापले आहेत.  त्यांनी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने धनपत यांच्यासारखी चूक करुन नये असा इशाराच दिला आहे.

धनपत यांच्या प्री-वेडींग शूटच्या व्हिडिओमध्ये ते पोलिसांच्या वर्दीमध्ये आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत दिसत आहे. मात्र या व्हिडिओमधील एका प्रसंगामध्ये धनपत यांची होणारी पत्नी त्यांच्या वर्दीच्या खिशात पैसे ठेवत त्यांना लाच देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पैसे खिशात ठेवल्यानंतर धनपत हसताना दिसत आहेत. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पोलिसांकडूनच लाच घेऊ नका आणि देऊ नका असा प्रचार केला जात असताना दुसरीकडे खात्यामधीलच एका अधिकाऱ्याने वर्दीमध्ये अशा व्हिडिओ शूट केल्याने धनपत यांच्यावर टीका होत आहे.

या प्रकरणामध्ये आता धनपत यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच खात्यामधील कोणत्याही व्यक्तीने अशाप्रकारची कोणतीही कृती करू नये असा समज वजा इशाराही देण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोलिसांचा अपमान करणारा असल्याचे मत पोलीस महानिरीक्षक हवा सिंह यांनी व्यक्त केले आहे. पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होईल अशी कोणतीही कृती यापुढे होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी नोटीसच हवा सिंह यांनी धनपत यांना पाठवली आहे.

(फोटो सौजन्य: टाइम्स नाऊ)

काय आहे व्हिडिओमध्ये

धनपत यांनी पोलिसांच्या वर्दीत शूट केलेला हा व्हिडिओ राज्यामध्ये व्हायरल झाला असून पोलीस खात्यामध्येही या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये धनपत हे वाहनांची तपासणी करताना दाखवण्यात आले आहेत. त्याचवेळी त्यांना एक मुलगी (होणारी पत्नी) भेटते. तीने नियम मोडल्यामुळे तिला धनपत पावती फाडायला सांगतात. मात्र ती मुलगी दंड भरण्याऐवजी धनपत यांच्या खिशामध्ये ५०० रुपयांची नोट सरकवते आणि निघून जाते. इतकेच नाही तर जाता जाता ती धनपत यांच्या पॅण्टच्या खिशातून पाकीटही चोरते असे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.

तुम्हीच पाहा हा व्हायरल झालेला व्हिडिओ

आता या प्रकरणात समज देऊन धनपत यांना सोडण्यात येते की त्यांच्यावर काही कठोर कारवाई होते का हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.