व्हॉट्स अॅप या सर्वाधिक प्रसिद्ध मेसेजिंग अॅपमधली एक आक्षेपार्ह इमोजी हटवण्यासाठी व्हॉट्स अॅपला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. गुरमीत सिंग या वकिलानं ही कायदेशीर नोटीस पाठवली असून पंधरा दिवसाच्या आत ‘मिडल फिंगर’ इमोजी व्हॉट्स अॅपवरून हटवण्यात यावा असं त्यांनी म्हटलं आहे.

‘मिडल फिंगर’ इमोजी दाखवणं हे आक्षेपार्ह तर आहेच पण, ते अश्लिलतेकडे झुकणारं आहे. भारतीय दंड संहितेतील कलमानुसार एखाद्या व्यक्तीसमोर अश्लील आणि आक्षेपार्ह हावभाव करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. त्याचप्रमाणे, आयर्लंडमध्येही ‘मिडल फिंगर’ दर्शवणं हे गुन्हा आहे या बाबीकडे गुरमीत यांनी लक्ष वेधलं. मिडल फिंगर’ इमोजी व्हॉट्स अॅपमध्ये देणं हे एकप्रकारे अश्लीलतेला प्रोत्साहन देण्यासारखं आहे. म्हणूनच ते १५ दिवसाच्या आत हटवण्यात यावं असं, या नोटिसीमध्ये सांगण्यात आलं आहे. या नोटिसीनंतर व्हॉट्स अॅप आता हे इमोजी हटवणार की नाही हे पाहण्यासारखं ठरेल.