आजही उजळ वर्ण म्हणजे सुंदर असणं असं मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र सुंदरतेच्या या बुसरटलेल्या मानसिकतेला छेद ती ‘मिस युनिव्हर्स ग्रेट ब्रिटन’ स्पर्धा जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय मॉडेल ठरली आहे. तिचं नाव आहे दी- अॅन रॉजर. १९५२ पासून ब्रिटनमध्ये दरवर्षी मिस युनिव्हर्स ग्रेट ब्रिटन’ ही सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यात येते. तेव्हापासून एकाही कृष्णवर्णीय मॉडेलनं ही स्पर्धा जिंकली नाही. मात्र २५ वर्षांच्या रॉजरनं ही स्पर्धा जिंकून नवीन इतिहास रचला आहे.

रॉजरनं डिसेंबर महिन्यात फिलिपिन्स येथे पार पडलेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ब्रिटनचं प्रतिनिधित्त्व केलं होतं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ४० हून अधिक स्पर्धेकांना मात देत तिनं हा किताब पटकावला आहे. ‘हा किताब पटकावणारी मी पहिली कृष्णवर्णीय मॉडेल ठरली आहे. याचा मला अभिमान आणि आनंदही आहे. ब्रिटन हा वैविध्यानं नटलेला देश आहे आणि याचा मी भाग आहे. या स्पर्धेनिमत्तानं मला माझ्या प्रांताचं प्रतिनिधित्त्व करायाला मिळालं हिच मोठी गोष्ट आहे’ असंही ती म्हणाली.

सौंदर्याची संकल्पना आता बदलत चालली आहे. श्वेत मॉडेलच्या स्पर्धेत माझ्यासारख्या कृष्णवर्णीय मुलीनं आत्मविश्वासानं भाग घेतला हा एक नवीन बदल आहे. आता माझ्यासारख्या अनेक मुली आत्मविश्वासानं यात सहभागी होतील अशीही भावना तिनं व्यक्त केली.