‘आमच्या वेळेस असं नव्हतं. काही पैशांना वडापाव मिळायचा,’ किंवा इतर कोणताही गोष्ट इतक्याच पैशांना मिळायची असं अनेकांनी आपल्या आईवडीलांकडून ऐकलं असेल. मात्र कोलकत्यामधील एका ठिकाणी आजही कचोरी केवळ २५ पैशांना मिळते. अर्थात २५ पैसे बंद होऊन आणि अगदी ५० पैशांचाही वापर कमी होऊन अनेक वर्ष झाली असली तरी कोलकात्यामधील लक्ष्मी नारायण घोष हे आजही २५ पैशांना कचोरी तर एक रुपयाला भजी प्लेट विकतात.

मानिकताला येथील लक्ष्मी यांचे १९९० पासून कोलकात्यामध्ये कचोरी आणि भजीचे दुकान आहे. आजही ते ५० पैशाला कचोरी विकतात तर शाळेतील मुलांसाठी कचोरीचा दर आजही केवळ २५ पैसे आणि भजीचा दर एक रुपया इतका आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार लक्ष्मी यांनी पश्चिम बंगालमध्ये ज्योती बासू मुख्यमंत्री असताना हे दुकान सुरु केले होते. त्यावेळेस त्यांनी सामान्यांसाठी कचोरीचे दर ५० पैसे इतका ठेवला होता तर शाळेतील मुलांना ते ५० टक्के सूट देत केवळ २५ पैशांना कचोरी विकायचे. आज २९ वर्षानंतरही लक्ष्मी यांनी आपले दर एका पैशानेही वाढवलेले नाहीत. सकाळी सात वाजता त्यांचे दुकाने सुरु होते तेव्हा दुकानासमोर ग्राहकांची मोठी गर्दी असते. सकाळी केवळ तीन तास दुकान चालू ठेवणाऱ्या लक्ष्मी यांच्या दुकानाबाहेर सकाळी दहापर्यंत गिऱ्हाईकांची मोठी रांग असते. त्यानंतर दुकान बंद करुन ते दुपारी दोन वाजता जेव्हा मुलांची शाळा सुटते तेव्हा दुकान सुरु करतात. दुपारी ते फक्त भजी विकतात. कोलकात्यामध्ये तेलभजा नावाने लोकप्रिय असणारे गोळा भजी, पीयाजी (कांदा भाजी), आलूर चोप (बटाटा भजी), मोचार चोप (केळफुलाच्या भजी), डोकार चोप (बेसनाच्या वड्या) आणि बेंगणी (वांग्याचे भजी) अशा अनेक प्रकारचे भजी विकतात. त्यांनी तयार केलेले चविष्ठ भजी खाण्यासाठी दुपारीही दुकानासमोर लहान मुलांबरोबरच दुपारच्या जेवणाची वेळ झालेल्या कर्मचाऱ्यांचीही रांग लागते कारण वेगवेगळ्या प्रकारचे मिक्स भजी प्लेटची किंमत लक्ष्मी यांनी आजही केवळ एक रुपया ठेवली आहे.

एकीकडे महागाई झपाट्याने वाढत असताना २९ वर्षांपासून खाद्य पदार्थांच्या किंमतीमध्ये एका पैशाचीही वाढ न करण्यामागे एक खास कारण आहे. “मी इतक्या वर्षांनंतर अचानक दरवाढ केल्यास अनेकांची निराशा होईल. मागील अनेक वर्षांपासून माझे ठरलेले ग्राहक येथे येऊन खातात. बाजूलाच असणाऱ्या शाळेतील मुलेही मोठ्या प्रमाणात इथे येऊन खातात. त्यामुळेच अचानक भाव वाढवल्यास त्यांना वाईट वाटेल. लोकांना खास करुन विद्यार्थ्यांना स्वस्तात खायला देऊन मला प्रचंड मानसिक समाधान मिळते,” असं लक्ष्मी २९ वर्षांपुर्वीचाच दर आजही ठेवण्याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाले.