कर्नाटकमधील म्हैसूर येथील एका वन अधिकाऱ्याने बिबट्याला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकला. १०० फूट खोल विहरीमध्ये अडकलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी या अधिकाऱ्याने स्वत: पिंजऱ्यामध्ये बसून या विहरीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. नागरहोल येथील एका कोरड्या विहरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र बिबट्याचा आवाज वगैरे काहीच येत नसल्याने वनअधिकाऱ्याने स्वत: पिंजऱ्यामधून विहरीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. या अधिकाऱ्याचे फोटो भारतीय वन विभागाच्या सेवेत असणाऱ्या प्रवीण कासवान यांनी ट्विटवरुन शेअर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पिंजऱ्यामधील अधिकाऱ्याचे नाव सिद्धराजू असं आहे. “हा आहे सिद्धराजू. नागरहोल येथील स्थानिक वनअधिकारी आहे. एका बिबट्याला वाचवण्यासाठी तो १०० फूट खोल कोरड्या विहरीमध्ये उतरला होता. हातात मोबाइल फोन, बॅटरी घेऊन स्वत:ला पिंजऱ्यामध्ये कोंडून हा अधिकारी बिबट्याला वाचवण्यासाठी कोरड्या विहरीत उतरला. याला म्हणतात आपल्या कामाबद्दलची प्रतिब्धता. अशा ग्रीन सोल्जर्सचा अभिमान वाटतो,” असं कासवान यांनी ट्विट केलं आहे. कासवान यांनी या ट्विटमध्ये या मदतकार्यातील कर्मचाऱ्यांबरोबरच स्वत:ला पिंजऱ्यात कोंडून कोरड्या विहरीमध्ये उतरणाऱ्या सिद्धराजूचा फोटोही पोस्ट केला आहे.

१०० फूट खोल विहरीमध्ये बिबट्या पडला असून त्याचा आवाजही येत नसल्याने अधिकाऱ्यांना तो नक्की कुठे आहे हेच समजत नव्हते. म्हणूनच सिद्धराजू यांनी स्वत: पिंजऱ्यामधून विहरीमध्ये बिबट्या नक्की कुठे अडकला आहे हे पाहण्यासाठी जायचं ठरवलं. ते बिबट्या पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये मांडी घालून बसले. त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉक केलं. त्यानंतर हा पिंजरा विहरीमध्ये सोडण्यात आला. मात्र सिद्धराजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सर्व मेहनत वाया गेली. कारण एवढा खटाटोप केल्यानंतर या विहरीमध्ये बिबट्या पडला नसल्याचे स्पष्ट झाले.

विहरीमध्ये बिबट्या आढळून आला नसला तरी सिद्धराजू यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि वन्यप्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकण्याची तयारी पाहून अनेकांनी सोशल नेटवर्किंगवरुन त्यांचे कौतुक केलं आहे.