सुश्रुत हे जगातील पहिले सर्वात महान असे शल्यचिकित्सक होते. प्राचीन भारतातील शल्यचिकित्सेचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा पुतळा ऑस्ट्रेलियातील एका महाविद्यालयात उभारण्यात आला आहे. मेलबर्नमधील रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ सर्जन्स या महाविद्यालयात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने याबाबतचे ट्विट केले आहे. भारताला अतिशय उत्तम परंपरा आहे अशा आशयाचा हॅशटॅगही सेहवागने यामध्ये वापरला आहे. त्यांच्या नावाची जगात पहिले शल्यचिकित्सक म्हणून नोंद आहे. सेहवागने या पुतळ्याचा फोटोही आपल्या ट्विटमध्ये अपलोड केला आहे.

सुश्रुत यांचा जन्म सहाव्या शतकात काशी येथे झाला. त्यांनी धन्वंतरीकडून यासर्व गोष्टींचे शिक्षण घेतले. ते सुश्रुत संहितेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. या संहितेला भारतीय चिकित्सा पद्धतीत विशेष स्थान आहे. या संहितेत शल्यचिकित्सेचे विविध पैलू अतिशय विस्ताराने समजावून सांगण्यात आले आहेत. शल्यचिकित्सेसाठी सुश्रुत १२५ प्रकारच्या उपकरणांचा वापर करत होते असा उल्लेखही यामध्ये आहे. या उपकरणांचा शोध शस्त्रक्रियेचे काठिण्य पाहून लावण्यात आला होता. यामध्ये विविध चाकू, सुया आणि चिमट्यांचा समावेश होता. सुश्रुत यांनी शस्त्रक्रियेचे ३०० प्रकार शोधून काढले.

चांगले शस्त्रक्रियातज्ज्ञ असण्याबरोबरच सुश्रुत हे उत्तम शिक्षकही होते. आपल्या शिष्यांना त्यांनी आपल्याकडील ज्ञान दिले. सुरुवातीला फळे, भाज्या, मेणाचे पुतळे यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या जात. त्यानंतर शरीरातील रचना समजण्यासाठी ते मृतदेहांचा वापर करत. शल्यचिकित्सेबरोबरच त्यांनी आयुर्वेदातील शरीर संरचना, बालरोग, स्त्रीरोग, मनोरोग यांचीही माहिती जगाला दिली. त्यामुळे भारतीय व्यक्तीने इतक्या वर्षांपासूर्वी दिलेल्या ज्ञानाचा जगात प्रसार होणे आणि आजही ते ज्ञान जगात दिले जाणे ही भारतीयांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. सेहवागने आपल्या पोस्टद्वारे ही गोष्ट सर्वांसमोर आणली आहे.