अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित एक हॉटेल जमीनदोस्त करण्यात आलं आहे. कॅसिनोसाठीही या हॉटेलची वेगळी ओळख होती. अटलांटिक सिटीमधील हे हॉटेल एकेकाळी ट्रम्प यांच्या मालकीचं होतं, आणि बिल्डिंगचं नावही ट्रम्प यांच्या नावावरुन ठेवलं होतं. बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांनी डायनामाइट लावून ‘ट्रम्प प्लाझा’ (Trump Plaza) इमारत जमीनदोस्त केली. हे दृष्य बघण्यासाठी मोठ्या संख्येत लोकांची गर्दी झाली होती. 34 मजली टोलेजंग इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळताच उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

Trump यांची पहिली प्रॉपर्टी होती :-
खूप वर्ष जुनी असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने ही इमारत धोकादायक ठरवून पाडण्याचे आदेश दिले होते. तब्बल ३००० डायनामाइट लावून अवघ्या काही सेकंदांमध्ये ३४ मजली इमारतीचं रुपांतर मातीच्या ढिगाऱ्यात झालं. ही इमारत 1984 मध्ये बांधली होती आणि गॅम्बलिंग टाउन नावाने ओळख असलेल्या अटलांटिक सिटीमधील ही डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली संपत्ती होती.

नाव हटवण्याची केली होती मागणी:-
2014 मध्ये ही इमारत बंद करण्यात आली होती. अनेक वादळांमुळे इमारतीचा बाहेरील भाग धोकादायक झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षी जुन महिन्यात शहराचे महापौर मार्टी स्मॉल यांनी इमारत जमीनदोस्त करण्याचा आदेश दिला होता. इमारत न पाडल्यास आजूबाजूला राहणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असं महापौर म्हणाले होते. 2016 पासून अब्जाधीश गुंतवणूकदार Carl Icahn हे या इमारतीचे मालक होते.  तर, 2014 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी या इमारतीवरील स्वतःचं नाव हटवण्याची मागणी केली होती. या इमारतीमुळे प्रतिमा मलिन होत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.


दरम्यान, ‘ट्रम्प प्लाझा’ जमीनदोस्त केल्यापासून अद्याप डोनाल्ड ट्रम्प यांची त्यावर प्रतिक्रिया आलेली नाही.