विमानतळावर पोहोचल्यानंतर तुमचं सामान प्रमाणापेक्षा जास्त आहे असं सांगितल्यावर कोणालाही खूप वाईट वाटतं. अशावेळेस अनेकदा बहुतांश लोकं काहीतरी जुगाड शोधतात. एकदा एक व्यक्ती तर सामानाचं वजन कमी करण्यासाठी एकावर एक अनेक टी-शर्ट घालून विमानात चढला होता. आता चीनमधून एक असाच अनोखा प्रकार समोर आलाय. सामान जास्त झालं म्हणून अतिरिक्त शुल्क द्यावं लागू नये यासाठी चार व्यक्तींनी असं काही केलं की त्यावर विश्वास ठेवणं कठीण होईल. चौघांकडे ३० किलो संत्रे होते, त्यामुळे सामानाचं वजन जास्त झालं होतं. अतिरिक्त पैसे भरावे लागू नये यासाठी त्या चौघांनी तब्बल ३० किलो संत्रे अवघ्या अर्ध्यातासातच फस्त केले. पण त्यानंतर मात्र एक वेगळाच त्रास त्यांना झाला. चीनच्या युनान प्रांतात ही घटना घडली.

वांग नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मित्रांसाठी ३० किलो संत्रे एका बॉक्समध्ये आणले होते. मित्रांसोबत बिजनेस ट्रिपला ते निघाले होते. संत्र्याचा बॉक्स त्यांनी ५० युआन ( जवळपास ५६४ रुपये) देऊन खरेदी केला होता. पण विमानतळावर पोहोचल्यावर सामान जास्त असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. एक्स्ट्रा सामानासाठी त्यांना ३०० युआन ( जवळपास३,३८४ रुपये) द्यावे लागले असते. मग काय… त्यांनी जुगाड शोधला.

वांग आणि त्याच्या मित्रांनी अतिरिक्त शुल्क खूप जास्त असल्यामुळे सर्व संत्रे तिथेच खाण्याचं ठरवलं. वांगने ग्लोबल टाइम्सला सांगितलं की, त्याच्या मित्रांनी आणि त्याने विमानतळावरच उभे राहून संत्रे खाण्यास सुरूवात केली आणि २० ते ३० मिनिटांमध्ये सर्व संत्रे संपवलेही. पण, इतके संत्रे खाल्ल्यामुळे असामान्य आहाराचा परिणाम त्यांना सहन करावा लागला आणि त्यांच्या तोंडात अल्सरचा त्रास होऊ लागला. “आता आयुष्यात पुन्हा कधीही संत्रे खाण्याची इच्छा होणार नाही”, असं त्यांनी सांगितलं. विमानतळावर येणारे-जाणारे अन्य प्रवासीही त्यांना उभं राहून इतके संत्रे खाताना बघून हैराण झाले होते.