रेल्वेत प्रवास करताना नेटवर्कच्या समस्येमुळे अनेकदा आपल्या इंटरनेट वापरावर मर्यादा येतात. अनेकदा इंटरनेटच्या असंतुलीत प्रवाहामुळे ऑनलाईन व्हिडीओ पाहताना अडथळे येतात. अशा अडचणींपासून सुटका करण्यासाठी रेल्वेने ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हे वायफाय प्रायोगित तत्वांवर मध्य रेल्वेत बसवण्यात येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पश्चिम, मध्य, हार्बर या तीन्ही मार्गावरील रल्वेमध्ये वायफाय बसवला जाणार आहे.

मध्य रेल्वेने सध्या १६५ लोकलमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या वायफाय सुविधेमुळे प्रवाशांना स्थिर इंटरनेटचा पुरवठा करता येईल. परिणामी प्रवाशांच्या इंटरनेट वापरात कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत. तसेच या सुविधेसाठी जे अॅप्लिकेशन वापरले जाणार आहे, त्यात काही चित्रपट, मालिका आणि गाणी प्रीलोडेड असणार आहेत. ही समग्री प्रवाशांना मोबाईलवर लॉगइन केल्यानंतर मोफत पाहता येणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी रेल्वेने एका खासगी कंपनीबरोबर करार केला असून यामुळे रेल्वेलादेखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या सुविधेमुळे रेल्वेमध्ये काही बिघाड झाल्यास या सेवेने प्रवाशांना मनोरंजन मिळेल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.