भारत भूमी खूप सुंदर आहे हे म्हणतात ते खोटे नाही, म्हणूनच भारतातल्या अनेक स्थळांना स्वर्गलोकाची उपमा दिली आहे. हिमालयात उगम पावणा-या नद्यांनी भारत भूमीला सुजलाम, सुफलाम बनवले आहे. निसर्गदेवतेचे जणू वरदानच या भूमीला लाभले आहे. ही भारत भूमी एका फ्रेंच अंतराळवीराला देखील खुद्द देवाची भूमी वाटली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणूनच त्यांच्या दृष्टीला अवकाशातून भारताचे जे काही चित्र दिसले ते जगाला दाखवण्याचा मोह त्यांना अनावर झाला.

भारताच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनी फ्रेंच अंतराळवीर थॉमस पेस्क्वेट यांनी ब्रम्हपुत्रा नदीचा एका फोटो शेअर केला. सूर्याची किरणे ब्रम्हपुत्रेच्या पात्रावर पडली होती. अन् तिचे पाणी जणू सोनेरी झाले असेच भासत होते. सुर्याची कोवळी किरणे पाण्यात उतरली आहेत आणि त्या तेजाने ब्रम्हपुत्राही उजळून निघाली आहे असे दृश्य त्याच्या नजरेला दिसले. तिचे तेज इतके अफाट होते की तिच्या तेजाने अवकाशात असलेल्या थॉमस यांचेही डोळे दिपले. अन् हे सुंदर दृश्य सोशल मीडियावर शेअर करण्याचा मोह त्यांना अनावर झाला. त्यांनी शेअर केलेले हे दृश्य भारतासाठी जणू प्रजासत्ताक दिनाची भेटच होती. तेजोमय झालेल्या या ब्रम्हपुत्रा नदीचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.