तुम्ही एखाद्या दुसऱ्या देशांमध्ये फिरायला गेल्यानंतर तेथील नियम आणि कायदे ठाऊक असणे गरजेचे असते. स्थानिक कायदे आणि नियम ठाऊक नसल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असते. असच काहीसं झालं इटलीमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका फ्रेंच दांपत्याबरोबर. येथील एका समुद्रकिनाऱ्यावरुन ४० किलो वाळू चोरताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. या दांपत्याला अटक करण्यात आली असून त्यांना चक्क सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इटलीमधील काही समुद्रकिनारे संरक्षित असून या किनऱ्यांवरुन वाळू घेऊन जाणे कायद्याने गुन्हा आहे.

‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सार्वजनिक ठिकाणावरील जनतेच्या उपयोगाची वस्तू चोरल्यास इटलीमध्ये सहा वर्षांपर्यंतची शिक्षा केली जाते.’ अटक करण्यात आलेल्या या दांपत्याच्या गाडीच्या डिकीमध्ये ४० किलो पांढरी वाळू सापडल्याचे ‘द टेलिग्राफ’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. १४ मोठ्या बाटल्यांमध्ये ही वाळू भरण्यात आली होती. हे दांम्पत्य इटलीमधील पोर्टो टॉरेसवरुन बोटीने दक्षिण फ्रान्समधील टॉयलोन बेटांकडे जाण्यासाठी निघाले असताना त्यांना अटक करण्यात आली.

अटक करण्यात आल्यानंतर आपण ही वाळू आठवण म्हणून घेऊ जात असल्याचे या दांपत्याने पोलिसांना सांगितले. आपण बेकायदेशीर काम करत असल्याची कल्पनाही नव्हती असं त्यांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना सार्वजनिक ठिकाणावरील वस्तू चोरल्याच्या आरोपाखाली अटक केली.

समुद्रकिनाऱ्यांवरील वाळू विकण्याचा हल्ली व्यवसाय सुरु झाला असून हा बेकायदेशीररित्या वाळूची तस्करीचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. सारडिनियन बेटसमुहांमधील किनाऱ्यांवरील वाळू चोरुन नेणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकरणांमुळे या सागरी किनाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे असं मत वैज्ञानिक पियरेलुगी कोको यांनी ‘बीबीसी’शी बोलताना व्यक्त केले आहे.