‘फ्लाइंग मॅन’ नावाने प्रसीद्ध असलेले फ्रांसचे फ्रँकी झपाटा गुरुवारी जेट-पावर ‘फ्लायबोर्ड’द्वारे ब्रिटिश खाडी पार करण्यासाठी निघाले होते. अशाप्रकारच्या कर्तबगारीमुळे जगभरात वेगळी ओळख निर्माण करणारे झपाटा ब्रिटिश खाडी पार करण्यामध्ये मात्र अयशस्वी ठरले. एका बोटीवर रिफ्युलिंग प्लॅटफॉर्म(इंधन पुन्हा भरण्याची जागा) चुकवल्यामुळे ब्रिटिश खाडी पार करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आणि ते समुद्रात जाऊन पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

5 टर्बाइन इंजिन असलेल्या हॉवरबोर्डवर उभं राहून माजी जेट-स्काइंग चँपियन 40 वर्षीय झपाटा यांनी फ्रांसच्या उत्तर भागातील संगते येथून उड्डाण घेतलं होतं. पाठोपाठ हेलिकॉप्टर देखील होतं. झपाटा यांच्या बॅकपॅकमध्ये 10 मिनिट पुरेल इतकं जवळपास 42 लीटर इंधन होतं. मात्र त्यांना ब्रिटिश खाडी पार करण्यासाठी अर्थात ‘सेंट मार्गारेट बे’ येथे पोहोचण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ लागणार होता. त्यामुळे मार्गाच्या मध्यावर असलेल्या रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मवर इंधन भरण्यासाठी उतरणं त्यांना आवश्यक होतं. पण 140 किमी प्रतितास वेगाने उडताना त्यांचा रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मचा अंदाज चुकला, हवेतून खाली येताना ज्या बोटीवर रिफ्युलिंग प्लॅटफॉर्म होता त्याठिकाणी उतरण्याऐवजी ते थोड्याच दूर अंतरावर पाण्यात पडले. यात त्यांना कोणतीही जखम झाली नाही, मात्र ब्रिटिश खाडी पार करण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

BFMTV टीव्हीच्या वृत्तानुसार, झपाटा यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्माचाऱ्यांपैकी एक सदस्य स्टीफन डेनिस यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, ‘हे खूपच निराशादायी आहे, कारण कोणत्याही अडथळ्यांशिवाय आम्ही याचा अनेकदा सराव केला होता,अगदी थोडक्यात झपाटा यांचा रिफ्युलिंग प्लॅटफॉर्मबाबतचा अंदाज चुकला आणि ते समुद्रात पडले. शोधनौकांनी तातडीने त्यांचा शोध घेतला, झपाटा यांना कोणतीही जखम झालेली नाही, पण खाडीपार न करता आल्यामुळे ते निराश आहेत’.
पाहा व्हिडिओ –