माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रेशवर्क कंपनीने आज त्यांच्या देशभरातील तीन हजार कर्मचाऱ्यांना फूल पगारी सुट्टी दिली आहे. सॉफ्टवेअर अॅज अस सर्व्हिसशी संबंधित या कंपनीने कर्मचाऱ्यांना सुट्टीसंदर्भातील मेल पाठवला आहे. “आपण या तिमाहीमध्ये छान काम केलं आहे. आपल्या टीममधील सर्वांनी खूप छान काम केलं आहे. तसेच घरुन काम करताना म्हणजेच वर्क फ्रॉम होम करताना अपेक्षित वेळापेक्षा जास्त काळ सर्वजण काम करत असल्याचे लक्षात आलं आहे, त्यामुळेच २४ जुलै रोजी सर्वांना सुट्टी देण्यात येत आहे,” असं या कंपनीच्या एचआरशी संबंधित अधिकारी असणाऱ्या सुमन गोपालन यांनी सीएनबीसी-टीव्ही१८ डॉट कॉमला सांगितलं.

नक्की वाचा >> IT कर्मचाऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत Work From Home; सरकारने वाढवली मुदत

“आपण कायमच काम आणि खासगी आयुष्यासंदर्भातील समतोल राखण्याबद्दल चर्चा करत असतो. त्यामुळेच आम्ही सर्वांना सुट्टी देण्याचा निर्णय घेत एक दिवस कंपनी बंद ठेवली,” असं सुमन म्हणाल्या. आजच्याच दिवशी सुट्टी देण्यामागे कर्मचाऱ्यांना शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा मोठा विकेण्ड तर मिळाला आहेच शिवाय आजच्या सुट्टीमुळे आणखी एक विशेष योग जुळून आला आहे. तो म्हणजे आजची तारीख. जुलै महिन्यातील आजची तारीख ही 24/7 अशी लिहिली जाते. म्हणजेच घरुन काम करताना आठवड्याचे सातही दिवस २४ तास ऑन ड्युटी असणाऱ्यांना या सुट्टीमुळे आराम मिळणार आहे. मुद्दाम ही तारीख निवडण्यात आलेली नाही असंही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. “शुक्रवारी सुट्टी देणं हे जास्त व्यवहार्य वाटतं. त्यातच आज २४ जुलै आहे हा निव्वळ योगायोग आहे. आम्ही काही विशेष विचार करुन आजची तारीख निवडलेली नाही,” असंही सुमन म्हणाल्या.

नक्की पाहा >> Work From Home मुळे दिवसभर बसून काम करताय? ‘हे’ व्यायाम नक्की करा

कर्मचारी करत असलेल्या कामाबद्दल त्यांना धन्यवाद देण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सुमन सांगतात. “लोकं करत असलेल्या कामाचे कौतुक करण्याबरोबरच घरुन काम करत असताना कर्मचाऱ्यांचे कुटुंबियही त्यांच्या पाठिशी असल्याने त्यांचेही कौतुक आम्हाला करायचं होतं,” असंही सुमन यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे घरुन काम करताना व्हिडिओ कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांच्या घरातील सदस्य व्हिडिओ कॉलमध्ये डोकावू शकतो असं फ्रेशवर्कच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कंपनीच्या अंतर्गत नियमांमध्ये (इंटरनल रुल्समध्ये) म्हटलं आहे. या सदस्यांमध्ये पाळीव प्राण्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> “कायम घरुनच काम केलं तर…”; सत्या नाडेलांचा ‘पर्मनन्ट वर्क फ्रॉम होम’ला विरोध

“आम्ही जेव्हा घरुन काम करण्यास सुरुवात केली तेव्हा सर्वजण खूपच उत्साहित होते. घरच्या कपड्यांमध्येच काम करता येईळ किंवा जास्त वेळ झोपता येईल किंवा मिटिंग कॉलच्या पाच मिनिटं आधी तयारी करता येईल याबद्दल आम्ही उत्सुक होतो. मात्र हा कालावधी एवढा मोठा असेल याचा आम्हाला अंदाज नव्हता,” असं सुमन यांनी सांगितलं. त्यामुळेच कर्मचाऱ्यांना मानसिक आराम मिळावा या हेतूने ही सुट्टी देण्यात आली आहे. “आपल्या दिवसाचे योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. दिवसभर आपण घरी असतो म्हणून दिवसभर काम करत राहणं शक्य नाही हे समजून घेतलं पाहिजे,” असं सुमन म्हणाल्या.