मुंबईतल्या बीडीडी चाळीतल्या १८० स्क्वेअर फुटांच्या घरात राहून तिने एक स्वप्न पाहिलं. नासा या जागतिक किर्तीच्या संशोधन संस्थेत काम करण्याचं. ते स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण मुंबईकर सुवर्णा कुराडे ही आता नासामध्ये रुजू झाली आहे. “माहिती आणि तंत्रज्ञानावर माझं अफाट प्रेम आहे. त्यात जे काही शिकता ते सगळं शिकण्याचा प्रयत्न होता. याचेच फलित म्हणून मी आज नासात आहे” असं सुवर्णा सांगते.

सुवर्णा कुराडे यांचे वडील पोलीस खात्यात होते. सुवर्णा यांनी मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहून पालिका शाळेतून शिक्षण घेतलं. सुवर्णा यांना गुरु म्हणून मारुती शेरेकर भेटले. तेव्हा त्यांच्याही शिक्षकी पेशाची सुरुवात झाली होती. त्यांच्यासोबतच धनाजी जाधव यांनीही सुवर्णामध्ये चुणूक आहे हे ओळखलं. या दोघांनीही तिला अतिरिक्त शिकवणी देण्यास सुरुवात केली. शेरकर यांनी इनडायरेक्ट स्पीच हे इंग्रजी व्याकरणातील प्रकरण शिकवले तिला इंग्रजीच्या पुस्तकातील या व्याकरण प्रकाराची जी उदाहरणं सापडतील ती लिहून आण असं सांगितलं होतं. सुवर्णाने तेव्हा १०० वाक्यं लिहून आणली तेव्हाच तिच्यातली अभ्यास करण्याची उर्मी शिक्षकांना दिसली होती.

१९९५ मध्ये सुवर्णाने दहावीच्या परीक्षेत ८८.१४ टक्के गुण मिळवले. त्यातही इंग्रजी विषयात सुवर्णाला ९० गुण मिळाले होते. तिचे हे यश पाहून शेरकर सरांनी तिला घड्याळही भेट दिलं होतं. यानंतर पुढे जिद्दीने शिक्षण घेत सुवर्ण यांनी पुढचा पल्ला गाठला.

कोणतीही गोष्ट कधीही कमी लेखू नका, मी स्वतःशीच स्पर्धा करत राहिले त्यामुळे मी नासामध्ये काम करते आहे. असं असलं तरीही मला आणखी खूप शिकायचं आहे. पालिकेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी असो किंवा अन्य कोणत्याही शाळेतील विद्यार्थी प्रत्येकांनी आपल्या मनातला विद्यार्थी सतत जागृत ठेवावा यश हमखास मिळते असं सुवर्णा कुराडे सांगतात.

सुवर्णा यांनी वांद्रे पॉलिटेक्निकमधून त्यांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा पूर्ण केला. मग तेथेच काही काळ नोकरी करीत कम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत नोकरी करताना त्यांनी शिक्षण मात्र थांबवले नाही. त्यांनी विविध व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या पातळी पूर्ण केल्या. ‘क्लाउड आणि नेटवर्किंगवर माझे खूप प्रेम आहे’, असे त्या सांगतात. यामुळेच त्यांनी अवघड अशा वेगवेगळ्या सर्व्हर ओएस, सिस्को सर्टिफिकेट नेटवर्किंगचाही अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या त्या क्लाउड कम्प्युटिंगमधील अझूर सोल्युशन आर्किटेक्ट तज्ज्ञ आहेत. त्यांची ही शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेत ‘नासा’ने त्यांची क्लाउड कम्प्युटिंग प्रकल्पात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यासाठी निवड केली आहे.