19 February 2019

News Flash

Viral Video: ‘Georgia’s Got Talent’च्या स्टेजवर ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष

अंतिम फेरीमध्ये वाजली 'मोरया मोरया', 'देव मल्हारी' ही मराठमोळी गाणी

सुरज तुरटे, अनुप ठाकूर, धनाजी मांडवकर (डावीकडून उजवीकडे)

भारतीय जगामध्ये कुठेही गेले तरी आपली कला आणि संस्कृती सोबत घेऊनच जातात. याच गोष्टीचा प्रत्यय सध्या सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमधून येत आहे. फेसबुकवर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये तीन मराठमोळे भारतीय ‘जॉर्जियाज गॉट्स टॅलेण्ट’ या रिअॅलिटी शोमध्ये मल्लखंबचा थरारक खेळ करताना दिसत आहे. हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वीचा असला तरी सध्या तो फेसबुकवर व्हायरल होत आहे. आणि त्यामागील कारण म्हणजे ज्या गाण्यावर या मुलांनी मल्लखंबची प्रात्यक्षिके सादर केली ते गाणे.

सुरज तुरटे, धनाजी मांडवकर आणि अनुप ठाकूर या तीन भारतीयांनी दोन वर्षांपूर्वी ‘जॉर्जियाज गॉट्स टॅलेण्ट’च्या उपांत्य फेरीमध्ये मल्लखंबची प्रात्यक्षिके छत्रपती शिवाजी राजांचे महात्म्य गाणाऱ्या कविराज भूषण यांनी रचलेल्या ‘इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर’ गाण्यावर सादर केली. या तिघांनी सादर केलेली ही प्रात्यक्षिके पाहून या कार्यक्रमाच्या परीक्षकांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली. या तिघांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर परीक्षकांबरोबरच उपस्थित प्रेक्षकांनी या तिघांना स्टॅण्डींग अव्हेशन दिले. आम्ही हे पहिल्यांदाच पाहत असून तुम्ही केलेली प्रात्यक्षिके थक्क करणारी आणि तितकीच थरारक होती असे मत परीक्षकांनी नोंदवले.

‘क्षत्रियकुलावतंस’ या फेसबुक पेजवरून आठवडाभरापुर्वी म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला दहा हजारहून अधिक शेअर्स आणि सहा लाखांहून अधिक हिट्स मिळाले आहेत.

पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ

(व्हिडिओ क्षत्रियकुलावतंस फेसबुक पेजवरून)

आपल्या परफॉर्मन्स आधी या तिघांनीही कार्यक्रमाच्या समालोचकांना तसेच परीक्षकांना भारतीय प्रथेप्रमाणे फुलांचे हार घालून आणि कपाळी गंध लावून कृतज्ञता व्यक्त केली.

पाहा संपूर्ण व्हिडिओ

याच परफॉर्मन्सच्या जोरावर या तिघांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. तेथेही त्यांनी ‘मोरया मोरया’, ‘देव मल्हारी’ या दोन मराठी गाण्यांवरच प्रात्यक्षिके सादर केली होती. अंतिम फेरीतही त्यांना स्टॅण्डींग अव्हेशन मिळाले होते. इतकेच नाही तर ही मुले कायमची आमच्या देशात राहिली तर इथेच ही मुले मल्लखंबची शाळाच सुरु करु शकतील असा विश्वासही परीक्षकांनी व्यक्त केला. तसेच या मुलांनी सादर केलेली कला भन्नाट असून ते विजयाचे प्रबळ दावेदार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

पाहा अंतिम फेरीतील परफॉर्मन्स

१३ डिसेंबर २०१५ रोजी पार पडलेल्या या अंतिम फेरीमध्ये प्रेक्षकांच्या मतांच्या आधारे आणि प्रक्षिकांच्या मताच्या आधारे विजेता निवडण्यात आला. ४८.६ टक्के प्रेक्षकांची मते मिळवून चौदा वर्षीय बार्बरा ही गायिका या स्पर्धेची विजेती ठरली. जरी या तिघांना स्पर्धा जिंकता आली नाही तरी त्यांनी प्रेक्षकांबरोबरच परिक्षकांची मनेही जिंकली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राची गाणी आणि भारतातील मल्लखंबची कला सातासमुद्रापार पोहचवली.

First Published on September 14, 2018 12:35 pm

Web Title: georgias got talent old video of mallakhamb india went viral on fb