काहीच काम न करण्याचे पैसे देतो असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आपली फसवणूक केली जात आहे का अशी शंका येईल. मात्र खरोखरच काही काम न करण्याचे तुम्हाल १ लाख ४१ हजार रुपये मिळत असतील तर? उडाला की नाही गोंधळ पण द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनीमधील एका विद्यापिठाने एका प्रयोगासाठी अर्ज मागवले असून काहीही काम न करण्यासाठी निवडक लोकांना पैसे दिले जातील असं म्हटलं आहे.

जर्मनीमधील हॅमबर्ग येथील यूनिव्हर्सिटी ऑफ फाइन आर्ट्सने इटलनेस ग्राण्ट म्हणजेच आळशीपणासाठी अनुदान देण्याची योजना तयार केली आहे. कोणतंही काम न करता एका प्रयोगासाठी केवळ बसून राहणाऱ्यांना एक हजार ६०० युरो दिले जातील. भारतीय चलनामध्ये हे मूल्य एक लाख ४१ हजार इतकं होतं. मात्र प्रयोगासाठी निवड करण्याची एक प्रक्रिया विद्यापिठाने निश्चित केली आहे. या प्रक्रियेनुसार अर्जदाराकडून एक फॉर्म भरुन घेतला जाणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणतं काम करायला आवडणार नाही?, काम न करता तुम्ही कितीवेळ राहू इच्छिता?, एखादं काम का केलं नाही पाहिजे असं तुम्हाला वाटतं?, तसेच कोणतही काम न करण्यासाठी तुमची सर्वोत्तम व्यक्ती म्हणून का निवड केली जावी असे काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.

या विद्यापिठामध्ये ज्या विषयाचा अभ्यास या प्रयोगामध्ये केला जाणार आहे तो विषय डिझायनिंग तज्ज्ञ फ्रेडरिक वॉन बोरिस याने मांडला आहे. स्थितरता आणि उच्च प्रशंसा म्हणजेच शांतपणा आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात मिळणारं प्रोत्साहन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी राहू शकतात असा दावा फ्रेडरिकने केला आहे. याचसंदर्भात हे संशोधन केलं जात आहे. “आम्हाला ‘सक्रीय निष्क्रियता’ या विषयाचा अभ्यास करायचा आहे,” असं फ्रेडरिक सांगतो. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं तर विद्यापिठाकडून काहीच न करण्याच्या कलेचा म्हणजेच ‘आर्ट ऑफ डुईंग नथिंग’चा अभ्यास केला जाणार आहे.

या प्रयोगामध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार नाही. यासंदर्भातील निवड पुढील काही महिन्यांमध्ये होणार आहे. निवड झालेल्या व्यक्तींना जानेवारी २०२१ पासून हा निधी दिला जाईल असं सांगण्यात आलं आहे.