जर्मनीमधील हम्म शहरातील पोलीस सध्या भरधाव वेगाने गाडी चालवून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका महिलेचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी जारी केलेली चित्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चक्क सहा वर्षाच्या मुलांनी काढलेली पेन्सील स्केच शेअर केली आहेत. या चित्रांमध्ये एक महिला बॅरिकेट्स तोडून गाडी वेगाने चालवत असल्याचे दिसत आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार हा अपघात शाळेत जाणाऱ्या सहा वर्षांच्या चार मुलांच्या समोर झाला. या चारही मुलांनी घडलेला सर्व प्रकार पाहिला. नंतर तपासादरम्यान या मुलांनी पेन्सिल स्केचच्या सहाय्याने काय घडलं हे पोलिसांना सांगितलं. आता पोलिसांनी ही चित्रं आपल्या ताब्यात घेतली असून ही चित्रं म्हणजे प्रत्यक्ष घटनास्थळावर काय घडलं यासंदर्भात भाष्य करणारा पुरावा म्हणून तपासाच्या कागदपत्रांचा भाग आहेत असं पोलीस खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक ही महिला होती. या महिलेने भरधाव वेगाने गाडी चालवताना बॅरिकेट्स तोडले. हा प्रकार घडला तेव्हा समोरच्या फुटपाथवर रस्ता ओलांडण्यासाठी काही मुलं उभी होती. या शाळकरी मुलांनी गाडी चालवणाऱ्या महिलेला बॅरिकेट्सला धडक देऊन वेगाने जाताना पाहिलं. पोलिसांनी या मुलांनी काढलेली चित्रं जारी केली आहेत. “ड्रॅगन क्लासमधील लुइसा, रोमी, सेलिना आणि लुइसने हे विशेष कौतुकास पात्र आहेत. या मुलांनी काळ्या रंगाची एक गाडी सकाळी पावणे नऊच्या समुरास एका बॅरिकेट्सला धडक देताना पाहिली. चालत शाळेत जाताना रस्ता ओलांडण्यासाठी फुटाथवर उभे असताना त्यांनी हा अपघात पाहिला,” असं पोलिसांनी ट्विटरवरुन हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे. अपराधी महिलेचे केस हे आकाराने लहान होते आणि ती बॅरिकेट्सला धडक दिल्यानंतरही न थांबता पुढे निघून गेली, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

 

मुलांनी या घटनेबद्दल आपल्या शिक्षकांना सांगितलं. त्यानंतर शिक्षकांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलांकडे यासंदर्भात विचारले असता त्यांनी चित्रांच्या माध्यमातून घडलेली घटना पोलिसांन सांगितली. ही चित्रं पोलिसांनी आता सार्वजनिक केली आहेत.