भारताला अण्वस्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्र्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेताच वीजेचा झटका बसल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

काश्मीरबाबतचे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी वारंवार भारताविरोधात वक्तव्ये केली आहे. काही दिवसांपूर्वी तर त्यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकीच देऊन टाकली. याच रशीद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत भारतावर टीका करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा चांगलाच झटका बसला.

पाकिस्तान काश्मिरी जनतेसोबत आहे हे दाखवण्यासाठी पाकिस्तानमध्ये आज (शुक्रवार) ‘काश्मीर अवर्स’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानी जनतेला रस्त्यावर उतरुन काश्मीरबाबत आपली एकजुटता दाखवण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी रशीद हे माईक हातात घेऊन जनतेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मोदींचे नाव घेताच त्यांना करंट लागला. त्यामुळे ते क्षणभर गोंधळले, या घटनेचे पाकिस्तानी माध्यमांच्या कॅमेरॅत चित्रीकरण झाले.

दरम्यान, पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणारे रशीद भारताविरोधात म्हणताहेत की, “आम्ही तुमच्या मोदी धोरणांना जाणून आहोत” तेवढ्यात त्यांच्या हातातल्या माईकमधून त्यांना वीजेचा झटका बसला आणि ते क्षणभर गोंधळून गेले. त्यानंतर ते पुन्हा म्हणतात की, “मला वाटतं माईकमधून करंट आला असेल मात्र, मोदी हा विरोध मोडून काढू शकत नाहीत”

काही दिवसांपूर्वी शेख रशीद हे लंडनध्ये गेले होते तेव्हा एका सभेला संबोधीत करुन बाहेर पडत असताना त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. यामुळे त्यांचा चेहरा खराब झाला होता, याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रशीद यांनी पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले होते की, ऑक्टोबरमध्ये किंवा त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध होईल. तसेच आम्ही आमची हत्यारे ईद किंवा दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत, जर पाकिस्तानच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला तर ते भारतावर हल्ला करतील.