घरामध्ये आढळणाऱ्या किटकांपैकी कोळ्याबद्दल अनेकांना कायमच जास्त भीती वाटते. पहिले कारण म्हणजे अनेक कार्यक्रमांमध्ये दाखवलं जातं त्याप्रमाणे काही कोळी विषारी असू शकतात हे आणि दुसरं म्हणजे त्यांनी विणलेली जाळी. जाळी विणणाऱ्या आणि सर्वसामान्याच्या परिचयाचा या किटकाबद्दल भीती असली तरी त्याच्याबद्दलची रंजक माहिती जाणून घेण्याची उत्सुकताही अनेकांना असते. त्यातच स्पायडरमॅनसारख्या चित्रपटांमुळे ही उत्सुकता आणखीनच वाढली आहे. याच ठाऊक असूनही रहस्यांसाठी कायमच चर्चेत असणाऱ्या कोळ्यांनी विणलेलं माणसाच्या आकाराचं जाळं अमेरिकेतील एका जंगलामध्ये नुकतचं आढळून आलं आहे. सध्या या भल्या मोठ्या आकाराच्या जाळ्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अमेरिकेतील मिझुरी राज्यामधील मिझुरी संवर्धन केंद्राच्या फेसबुक पेजवर या भल्या मोठ्या आकाराच्या जाळ्याचा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो फ्रॅन्सीस स्कॅलिस्की यांनी काढला आहे. स्पीनफिल्डच्या जंगलांमध्ये फिरताना त्यांना हे गोलाकार आकाराचं कोळ्याचं जाळं आढळून आलं. मिझुरीमध्ये अशाप्रकारे गोलाकार आकारात जाळं विवणाऱ्या कोळ्याच्या अनेक प्रजाती आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये ही जाळी जंगलांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येतात. जेव्हा ही पूर्णपणे बांधून होतात तेव्हा एकाद्या व्यक्तीच्या आकाराऐवढी असतात. फोटोत दिसणारं हे जाळं खाण्याच्या ताटापेक्षा मोठ्या आकाराचं आहे, असं या फोटो सोबतच्या डिस्क्रीप्शनमध्ये पोस्ट करण्यात आलं आहे. फोटोमध्ये दिसणारे हे जाळं दोन मोठ्या झाडांच्या मध्ये विणण्यात आलं आहे.

या पोस्टबरोबर देण्यात आलेल्या लिंकमध्ये अशाप्रकारची जाळी स्पॉटेट ऑर्बवेव्हर्स प्रजातीचे कोळी विणतात असं म्हटलं आहे. या किटकाचे धड केवळ अर्ध्या इंच लांबीचे असते. स्पॉटेट ऑर्बवेव्हर्समध्ये मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून तो मागील आठवड्याभरात दोन हजार ९०० हून अधिक जणांनी शेअर केला आहे. या फोटोवर अनेकांनी कोळी एवढ्या मोठ्या आकाराचं जाळं विणू शकतो हे आपल्याला ठाऊक नव्हतं असं म्हटलं आहे. तर काही जणांनी जंगलात जाण्याआधी मला ही माहिती मिळाली हे बरं झालं आता मी जंगलात जाण्याऐवजी दुसरीकडे जाईल अशापद्धतीच्या मजेदार कमेंटही दिल्या आहेत.