भारताचे निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानला जात आहे. मात्र, पाकिस्तानने हा विजय आमचाच असल्याची प्रतिक्रिया दिलीये. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मजेशीर रिप्लाय देत चांगलीच खिल्ली उडवली. याबाबत सिंह यांनी एक ट्विट केलं असून त्यांचं ट्विट प्रचंड व्हायरल होतंय. सोशल मीडियावर त्यांच्या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देताच पाकिस्तान सराकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा आमचा मोठा विजय आहे असं ट्विट करण्यात आलं. कुलभूषण जाधव यांची सुटका करण्याची तसेच त्यांना भारतात परत पाठवण्याची केलेली भारताची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फेटाळली. हा पाकिस्तानचा मोठा विजय आहे असं ट्विट करण्यात आलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना गिरिराज सिंह यांनी चूक ट्विट नाहीये….निकाल इंग्रजीत सुनावण्यात आला असं मजेशीर ट्विट केलंय. क्रिकेट विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी चाहत्यांना इंग्रजी भाषेच्या अज्ञानावरुन मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात होतं, आणि गिरिराज यांनीही त्याच आशयाचं ट्विट केल्याने त्यांचं हे ट्विट नेटकऱ्यांच्या चांगलंच पसंतीस पडल्याचं दिसतंय.

मित्र, नातेवाईकांमध्ये आनंद अन् भीतीही-

दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात येत असून, कुलभूषण जाधव यांच्या मुंबईतील मित्रांनी पेढे वाटून, फुगे हवेत सोडत जल्लोष केला. या प्रकरणात पाकिस्तान तोंडघशी पडले असून, आता कुलभूषण यांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी त्यांचे बालपणीचे मित्र अरविंद सिंग यांनी केली. न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, पाकिस्तान त्याची अंमलबजावणी करेल का, अशी भीतीही त्यांच्या अनेक मित्रांनी व्यक्त केली. ‘या प्रकरणात भारत सरकार करत असलेल्या परिश्रमाबद्दल आम्हाला आनंद आहे. मात्र, कुलभूषण यांना पाकिस्तानमधून भारतात आणले जाईपर्यंत भीती कायम राहील’’, असे कुलभूषण यांचे नातेवाईक निवृत्त एसीपी सुभाष जाधव यांनी सांगितले.