बंजी जम्पिंग करताना इन्स्ट्रक्टरने तरुणीला दोरी न लावताच ढकलल्याच्या व्हिडिओच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्या तरुणीला दोरीने बांधण्यात आले होते, हे दाखवणारा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. मात्र, ही घटना नेमकी कुठे घडली, हे अजूनही अस्पष्ट आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून एका तरुणीचा बंजी जम्पिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात इन्स्ट्रक्टरने तरुणीला दोरी न लावताच ढकलल्याचे दिसत होते. या व्हिडिओनंतर बंजी जम्पिंग करताना इन्स्ट्रक्टरची एक चूक किती महागात पडू शकते, असा सवाल उपस्थित होत होता. अनेकांनी त्या इन्स्ट्रक्टरवरही टीका केली. मात्र, अखेर या व्हिडिओचा दुसरा भागही समोर आला आहे.

यूट्यूबर व्हिडिओचा दुसरा भागही अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओत तरुणीच्या कमरेला दोरी बांधल्याचे दिसते. पहिला व्हिडिओ हा पाठीमागून शूट करण्यात आला होता. तर दुसरा व्हिडिओ हा समोरच्या अँगलने शूट करण्यात आला आहे. तरुणीच्या पायाला समोरील बाजूने दोरी बांधण्यात आली होती, असा दावा या व्हिडिओत करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर हा दुसरा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी कुठे घडली, व्हिडिओतील तरुणी आणि इन्स्ट्रक्टर यांच्याबाबत अद्याप कोणताही तपशील समजू शकलेला नाही. त्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा, याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.