नोटाबंदीच्या निर्णयामुळे बँकेबाहेर रांगा लागल्या आहेत. या रांगांमध्ये तासन तास उभे राहून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र नाशिकमधील एका तरुणीला या रांगेत तिचा बेवफा प्रियकर भेटला आहे. बेवफा प्रियकराला बघून त्या तरुणीचा पारा चढला आणि तिने नातेवाईकांना बोलावून त्या बेवफा प्रियकराला ‘प्रसाद’ दिला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार नाशिकमधील सातपूर येथील एका बँकेबाहेरील रांगेत तरुणी उभी होती. या दरम्यान त्या तरुणीला रांगेत एक तरुण दिसला. त्याला बघताच तरुणीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हा तरुण म्हणजे त्या मुलीचा चार – पाच वर्षांपूर्वीचा प्रियकर होता. लग्नाचे वचन देऊन त्याने तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र एक दिवस अचानक तो तरुण तिच्या आयुष्यातून निघून गेला. ऐवढ्या वर्षांनी हा प्रियकर तिला दिसला तोही बँकेच्या रांगेत. आपल्याला दगा देऊन जाणा-या या रोमिओला धडा शिकवण्याचा निर्धारच त्या तरुणीने केला. तिने तातडीने भाऊ आणि वडिलांना मेसेज केला. यानंतर तिच्या भाऊ आणि वडिलांनी बँकेजवळ धाव घेतली आणि त्या तरुणाला चोप दिला. या बेवफा तरुणाविरोधात पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार अर्जही दिला आहे. फसवणूक, लैंगिक शोषण अशा विविध कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तिने केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नेटीझन्सच्या विस्मरणात गेलेली सोनम गुप्ता २ हजारांच्या नोटेमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीस आली होती. अगदी १० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंतच्या अनेक नोटांवर या सोनमच्या दग्याफटक्याचे दाखले दिले जात होते. सोशल मीडियावर सोनम गुप्ता बेवफा है हा हॅशटॅगही ट्रेंडिंगमध्ये होता. आता ही बेवफा सोनम गुप्ता सापडली नसली तरी नाशिकमधील तरुणीला तिचा बेवफा प्रियकर मात्र सापडला. नाशिकमधील ही घटना अगदी सोशल मीडियावरचा विनोद ठरावा अशीच ठरली आहे.