तरूण-तरूणी एकमेकांचे मित्र-मैत्रीण असणे या नात्याचे प्रेमात रूपांतर होणे या गोष्टी आता नव्या राहिलेल्या नाहीत. विदेशात तर या सगळ्या गोष्टी अगदीच कॉमन आहेत. प्रेम ही काही सांगून होणारी गोष्ट नाही. त्याचमुळे सगळ्यांच्याच आयुष्यात प्रेम करणारा एखादा बॉयफ्रेंड किंवा एखादी गर्लफ्रेंड येतेच असे नाही. मात्र एका मुलीने बॉयफ्रेंड मिळविण्यासाठी अतिशय अनोखी शक्कल लढवली आहे. विशेष म्हणजे या मुलीने स्वत:च आपला विक्रम सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही लव्ह स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आता या मुलीने असे काय केले आहे की तिची ही पोस्ट इतकी व्हायरल व्हावी. तर हॅली रॉबिन्स नाव असलेल्या या मुलीने आपले नाव आणि मोबाईल क्रमांक लिहिलेला एक बॉल समुद्रात फेकला. त्यावर ज्या मुलाच्या हाती हा बॉल लागेल त्याने या क्रमांकावर संपर्क करा असेही तिने लिहीले होते. आता गंमत म्हणून केलेल्या या गोष्टीचा खरंच काही परिणाम होईल असे हॅलीलाही वाटले नसेल. पण चक्क ६ वर्षांनंतर तिने लिहीलेला बॉल कोणाच्या तरी हाती लागला आणि तिला त्यावरुन एक मेसेजही आला. या मुलाचे नाव अॅडम असून त्याने आपल्याला केलेल्या मेसेजचा फोटोही हॅलीने आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. ‘एनडीटीव्ही इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

लव्हस्टोरीत ट्विस्ट

आता ही गोष्ट इथेच संपली नाही. तर हे दोघे एकमेकांशी स्नॅपचॅटवर बोलत होते. स्नॅपचॅटवर आपण बोलत असलेल्या व्यक्तीचे नाव अॅडम नसून अॅश्ले असल्याचे हॅलीला समजले. तिने त्याबाबत समोरच्या व्यक्तीला विचारणाही केली. तर आपण अॅडम नसून अॅश्ले नावाची महिला असल्याचे या व्यक्तीने सांगितले. आपण अशाप्रकारे चेष्टा केल्याबद्दल या महिलेने हॅलीची माफीही मागितली. आपण चांगल्या मैत्रीणी होऊ शकतो असेही या महिलेने मेसेजव्दारे सांगितले. या अजब प्रकाराची हॅलीची पोस्ट अनेकांनी रिट्विट केली असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही आल्या आहेत.