अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचा नायक चित्रपट तुम्हाला आठवतोय का? त्या चित्रपटात अनिल कपूर यांनी एका दिवसाच्या मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये असेलला हा प्रकार खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडला आहे. तसाच नसला तरी काहीसा त्याच्याशी मिळताजुळता प्रकार कोलकातामध्ये घडला आहे. बारावीच्या परिक्षेमध्ये राज्यात प्रथम आल्यानंतर रिचा सिंग नावाच्या मुलीला एका दिवसासाठी कोलकाता पोलीस उपायुक्त पदाचा कार्यभार सांभाळण्यास दिला. सोशल मीडियावर याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

७ मे रोजी आयएससी (बारावी)चा देशभरातील निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये रिचानं देशात चौथं तर राज्यात प्रथम स्थान पटकावलं. रिचा सिंगने बारावीमध्ये ९९.२५ टक्के गुण घेत घवघवीत यश संपादन केलं. रिचाने मिळवलेल्या यशाचा सन्मान करण्यासाठी कोलकाता पोलीस विभागाने तिला एक दिवसाची पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी दिली.

रिचा सिंगचे वडिल राजेश सिंह कोलकाता पोलिसांत निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. मुलीच्या यशानंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ज्यावेळी रिचा पोलीस उपायुक्त झाली तेव्हा तिला विचारण्यात आले की, वडिलांसाठी काय आदेश देशील? कारण रिचा एक दिवसांसाठी वडिलांची बॉस होती. त्यावर रिचा म्हणाली की, ‘त्यांना मी लवकर घरी जाण्याचा आदेश देईल.’

रिचा आणि कोलकाता पोलिसांवर सोशल मीडियातून कौतुकांची थाप पडत आहे. राज्यात प्रथम आल्यामुळे रिचाचे कौतुक केले जात आहे. तर रिचाचा योग्य तो सन्मान केल्यामुळे कोलकाता पोलिसांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.