सोन्याचे दर ४० रुपये प्रती तोळा इतके वाढले आहेत. मात्र सोन्याचा भाव इतका वाढल्याने अनेकांनी ज्वेलर्सच्या दुकानांकडे पाठ फिरवली आहे. असं असलं तरी या दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी मात्र आनंदामध्ये नाचताना दिसत आहेत. सोन्याचा दर वाढल्याने हे कर्मचारी नाचत आहेत असं तुम्हाला वाटतं असेल तर ते चुकीचं आहे. खरं तर सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळेच ज्वेलर्सच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी कंटाळा येऊ नये म्हणून चक्क दुकानामध्येच गाणी लावून डान्स करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ज्वेलर्सच्या भव्य शोरुममध्ये एकही ग्राहक दिसत नाही. मात्र याच संधीचा फायदा घेऊन नुसतं दुकानात बसून कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळ घालवण्यासाठी मोठ्याने गाणी लावून नाचण्यास सुरुवात केली. सोन्याच्या दरामध्ये मागील काही आठवड्यांपासून एक दोन अपवाद वगळता सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दर मागील काही महिन्यांमध्ये जवळजवळ २५ टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका महिन्यातच सोन्याचे दर दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र सोन्याचे भाव वाढल्याने सामान्यासाठी सोने खरेदी करणे चांगले महागले आहे. अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पूर्वी लोक केवळ दागिण्यांसाठी सोने खरेदी करायचे. मात्र आता अनेकजण गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करतात. त्यामुळेच सोन्याची मागणी वाढली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला असून तो सतत वाढताना दिसत आहे. याच वाढत्या दरांमुळे अनेकांनी सोने खरेदी करण्याकडे पाठ फिरवल्यानेच ज्वेलर्सची दुकाने ओस पडली आहेत. अशातच गर्दी नसल्याने एका दुकानात कर्मचाऱ्यांनी डान्स केल्याचे सांगत एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे.

दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ

दरम्यान असं असलं तरी हा व्हिडिओ आताचा नसून दोन वर्षांपूर्वीचा आहे. ‘फॅक्ट क्रेसेंडो’ या मराठी फॅक्ट चेक वेबसाईटने केलेल्या तपासामध्ये मनोहरलाल ज्वेलर्समधील असल्याचे समोर आले आहे.  या ज्वेलर्सचे प्रदीप शुक्ला यांनी ‘फॅक्ट क्रेसेंडो’ला दिलेल्या माहितीनुसार ‘हा व्हिडिओ मनोहरलाल ज्वेलर्सच्या प्रीत विहार दुकानातील असून, ग्राहक नसल्यामुळे कर्मचारी नाचत असल्याचा दावा खोटा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ यावर्षीचा नसून दोन वर्षांपूर्वीचा आहे.’ तसेच “मनोहरलाल ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये कर्मचारी सकारात्मक ऊर्जेने काम करावे म्हणून सकाळी हा उपक्रम घेण्यात येत असे. कर्मचारी थोड्यावेळा करीत नाचून प्रसन्न मनाने कामाल सुरूवात करीत. याच उपक्रमाचा हा व्हिडिओ आहे. त्याचा सध्या वाढत असलेल्या सोन्याच्या दराशी काही संबंध नाही,” असे स्पष्टीकरण शुक्ला यांनी दिले आहे. ‘फॅक्ट क्रेसेंडो’चा मूळ लेख तुम्ही येथे वाचू शकता.