इंटरनेटच्या महाजालातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेलं गुगल अनेक वेळा वेगवेगळे डूडल तयार करत असतो. गुगलच्या या संकल्पनेमुळे काही आठवणींना उजाळा मिळतो. तर काही गोष्टींविषयी नव्याने माहिती मिळते. आज गुगलने असंच एक डुडल तयार केलं असून या डूडलच्या माध्यमातून त्यांनी व्हॅक्युम क्लिनरचे जनक हबर्ट सेसिल बूथ Hubert Cecil Booth यांच्या आठवणींना उजाळा दिलाआहे.

महिलांच्या रोजच्या धावपळीमध्ये त्यांना मदतीचा हात मिळावा यासाठी व्हॅक्युम क्लिनर तयार करणाऱ्या हबर्ट सेसिल बूथ Hubert Cecil Booth यांची आज १४७ वी जयंती. त्यांच्या जयंती निमित्ताने गुगलने खास डूडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे.
गुगलने तयार केलेल्या डूडलमध्ये एक व्यक्ती व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने जमिनीवरील धुळ साफ करत असून या व्हॅक्युम क्लिनरची धूळ जमा करण्याची टाकी एका घोड्याला जोडलेली आहे.

हाबर्ट यांचा जन्म ४ जुलै १८७१ रोजी इंग्लंडमधील ग्लोसेस्टर येथे झाला. हबर्ट यांनी त्यांचं अभियांत्रिकीचं शिक्षण लंडनमधील सेंट्रल टेक्निकल महाविद्यालयातून पूर्ण केलं. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मॉडस्ले या कंपनीमध्ये काही वर्ष काम केले. त्यानंतर १८८४ ते १८९८मध्ये त्यांनी प्रथमच लंडनमधील अॅम्युजमेंट पार्क याचा आराखडा तयार केला आणि त्यानंतर स्टील रेल्वे ब्रीजचा प्रकल्प त्यांच्या पदरात पडला. विशेष म्हणजे यानंतर अनेक चांगले चांगले प्रकल्प त्यांनी हाताळल्याचं पाहायला मिळालं.
त्यांच्या प्रवासामध्येच ते ब्रिटीश व्हॅक्युम क्लिनर अॅण्ड इंजिनिअरिंग या कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय पदाची धुरा सांभाळली. मात्र, १४ जानेवारी १९५५ रोजी इंग्लंडमधील क्रॉयडॉन येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.