भारतातील पहिल्या महिला छाया पत्रकार (फोटो जर्नलिस्ट) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होमी व्यारवाला यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त आज गुगलकडून खास डुडल तयार करण्यात आले आहे. होमी व्यारवाला यांचा जन्म गुजरातमधील पारशी कुटुंबात झाला. त्यांनी बालपणी आपल्या वडलांच्या नाटक कंपनीबरोबर अनेक ठिकाणी प्रवास केला. त्यानंतर होमी व्यारवाला यांनी मुंबई विद्यापीठ आणि जे.जे. आर्टस स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. या काळात एका मित्राने त्यांना फोटोग्राफी शिकवली. तेव्हा होमी अवघ्या १७ ते १८ वर्षांच्या होत्या. मात्र, तेव्हापासूनच त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून काम करायला सुरूवात केली. डाल्डा १३ या टोपणनावानेही त्या परिचित होत्या. होमी यांचा जन्म १९१३ साली झाला होता आणि त्यांच्या गाडीचा क्रमांक DLD 13 असा होता. यावरूनच त्यांनी डाल्डा १३ हे टोपणनाव धारण केल्याचे सांगितले जाते.

मनेक्षा व्यारवाला यांच्याशी लग्न झाल्यानंतर होमी यांनी खऱ्या अर्थाने आपल्यी कारकिर्दीची सुरूवात केली. मनेक्षा व्यारवाला हे टाईम्स ऑफ इंडियात छायाचित्रकार आणि अकाऊंटंट म्हणून काम करत होते. त्यामुळे होमी यांची सुरूवातीची छायाचित्रे डाल्डा १३ किंवा त्यांच्या पतीच्या नावाने प्रसिद्ध झाली होती. होमी यांनी ब्रिटनची राणी ‘क्वीन एलिझाबेथ २’ आणि दलाई लामा यांची अविस्मरणीय छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद केली. याशिवाय, त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या काळात काढलेली छायाचित्रेही खूपच लोकप्रिय ठरली. १९३० पासून सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत होमी यांनी भारताची स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा फडकलेला तिरंगा, महात्मा गांधीजींची अंत्ययात्रा यासारखे अनेक महत्त्वपूर्ण क्षण कॅमेऱ्यात टिपले.

१९७० साली पती मनेक्षा व्यारवाला यांच्या मृत्यूनंतर होमी यांनी छायाचित्रण थांबवले. त्यानंतर त्या आपल्या मुलाबरोबर वडोदरा येथे राहू लागल्या. सरकारने होमी यांना पद्म विभूषण पुरस्काराने गौरवले होते. १५ जानेवारी २०१२ रोजी होमी यांचे निधन झाले.