‘चूल आणि मूल’ याच्या पलीकडे जाऊन स्त्रिया किती तरी गोष्टी करू शकतात याची जाणीव समाजाला ठळकपणे करून देण्यात ज्यांचा वाटा सर्वाधिक होता अशा ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांची आज १३६ वी जयंती. त्यानिमित्तानं गुगलनं डुडल तयार करून साहित्यविश्वात मानाचा ठसा उमटवणाऱ्या या ब्रिटीश लेखिकेला आदरांजली वाहिली आहे. अतिशय बुद्धिमान, तितक्याच संवेदनशील आणि शब्दांवर जबरदस्त पकड असणार्या या लेखिका ब्रिटनमधल्या एका सधन कुटुंबात जन्मल्या. आयुष्यभर लेखन, वाचन हा एकच ध्यास घेऊन जन्मलेल्या व्हर्जिनिया यांना इंग्रजी साहित्याच्या दरबारात मानाचं स्थान आहे. केवळ वयाच्या नवव्या वर्षी व्हर्जिनिया यांनी आपल्या भावाच्या मदतीनं ‘२२ हाइडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक काढलं हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.

शब्दांवर प्रचंड हुकूमत, सातत्य, संवेदशील लिखाण आणि लेखनात प्रयोगशीलता हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट. ‘मिसेस डलोवे’, ‘टू द लाइटहाऊस’, ‘द वेव्हज’ यांसारख्या कांदबऱ्या आणि ‘अ रूम ऑफ वन्स ओन’ आणि ‘थ्री गिनीज’ हे त्यांचे निबंध खूपच गाजले. ब्रिटनमधल्या सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला असला तरी स्त्री म्हणून आपल्यावर बालपणी झालेल्या अन्यायाची खदखद त्यांच्या मनात होती. त्यांचे वडिल सर लेस्ली स्टीफन यांचा मुलींना औपचारिक शिक्षण देण्यास विरोध होता. त्यामुळे त्यांचं शिक्षण हे घरच्या ग्रंथालयावरच अवलंबून झालं, पण त्यांचे भाऊ मात्र केम्ब्रिजमध्ये शिकायला गेले, आणि तेव्हापासून स्त्रियांच्या शैक्षणिक हक्काबद्दल त्यांनी आग्रह धरला. सतत वाचन लेखन करून आपली वैचारिक पातळी उंचावली. वयाच्या १९ व्या वर्षी टाइम्स लिटररी सप्लिमेंटमध्ये ग्रंथसमीक्षणे लिहिण्यास त्यांनी सुरुवात केली.

raj thackray mns latest news
अग्रलेख: मनसबदारच..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
are menstrual cups safe how they work pros and cons menstrual cup dangers safety risks and benefits
मेंस्ट्रुअल कप वापरणं खरंच सुरक्षित आहे का?तुमच्या मनातही आहेत का ‘हे’ १० प्रश्न; मग येथे वाचा उत्तरं…

साहित्यातील त्यांचं स्थान अबाधित होतंच पण त्याचबरोबर त्यांनी इतरांच्या लेखनाचाही आदर केला. वाचकांविषयीही त्यांच्या मनात खूप आदर होता. ‘वाचकांचा भरपूर आदर करणारं लेखन आपण लेखकांनी केलं पाहिजे कारण हे वाचकच आपल्या लेखनाचं पोषण, संवर्धन करतात,’ अशी त्यांची धारणा होती. म्हणूनच दर्जेदार आणि संवेदनशील लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांचं नाव अग्रगण्य होतं , आहे आणि भविष्यातही राहणार. पण या लेखिकेचा अंतही तितक्याच करुणपणे झाला. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर नैराश्याचा मानसिक आजार व्हिर्जिनिया यांना जडला होता. दुसऱ्या महायुद्धाचं रणशिंग फुंकल्यावर त्यांची मानसिक स्थिती आणखीच खालावली. त्याचे पती लिओनार्ड वुल्फ ज्यू होते, त्यामुळे आपलाही लाखों ज्यूंसारखा छळ होऊन मृत्यू होईल याची कल्पना त्यांना असह्य होऊ लागली. २८ मार्च १९४१ साली त्या घरातून निघाल्या. आपल्या कोटाच्या खिशात भरपूर दगड भरून त्या घराशेजारी असणाऱ्या तलावाच्या दिशेने गेल्या त्यानंतर त्या कधीच परतल्या नाही. १८ एप्रिलला त्यांचा मृतदेह सापडला.