अनोळखी रस्त्यांवर कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी अनेकदा आपण गुगल मॅपची मदत घेत असतो. परंतु कधी मदतीऐवजी आपणच अडचणीत आलो तर… होय, 100 चालकांना गुगल मॅपचा आधार घेणं भारी पडलं, जेव्हा ते अशा ठिकाणी पोहोचले जिकडून त्यांना बाहेर पडणंही फार कठिण होतं. गुगल मॅपचा वापर करणाऱ्या चालकांना मॅपने अशा ठिकाणी नेले जो रस्ता पूर्णपणे चिखलाचा होता आणि त्या रस्त्यावरून पुन्हा मागे फिरणंही अशक्य होतं. 100 पेक्षा अधिक गाड्या अनेक तासांपर्यंत या ठिकाणी अडकून पडल्या होत्या.

अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये हा प्रकार घडला. ‘डेनवर’ एअरपोर्टला जाणाऱ्या मार्गावर घडलेल्या या प्रकाराने अनेकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला. ‘डेनवर’ एअरपोर्टला जाणाऱ्या रस्त्याला गुगल मॅपने एक पर्यायी रस्ता दाखवला. तसेच मुख्य रस्त्यापेक्षा पर्यायी रस्त्यावरून पोहोचण्यासाठी लागणारा वेळही कमी दाखवण्यात आला होता. मुख्य रस्त्यावरून एअरपोर्टवर पोहोचण्यासाठी 43 मिनिटे दाखवण्यात येत होती. तर पर्यायी रस्त्यावरून एअरपोर्ट केवळ 23 मिनिटे दाखवण्यात येत होते. त्यामुळे गुगल मॅपवर विश्वास ठेवून शेकडो चालकांनी पर्यायी मार्ग स्वीकारला.

सुरूवातीच्या काही किलोमीटरपर्यंत पर्यायी मार्ग हा चांगला होता. मात्र, नंतर हा रस्ता पूर्णपणे चिखलाचा असल्याचे दिसून आले. तसेच या रस्त्यावरून जाताना अनेक गाड्या घसरण्याचेही प्रकार घडले. तसेच हा सिंगल रूट असल्यामुळे गाड्यांना पुन्हा मागे फिरणे अशक्य बाब होती. त्यामुळे या रस्त्यावर गाड्यांची मोठी रांग लागली. गाड्या चिखलात अडकल्यामुळे अनेकांच्या गाड्यांचं मोठं नुकसानही झालं. दरम्यान, हा खासगी रस्ता असल्याची माहिती काही जणांकडून देण्यात आली. परंतु हा खासगी रस्ता म्हणून मार्क करण्यात आले नसल्याचे गुगलकडून सांगण्यात आले. ड्रायव्हिंग रूट म्हणून एखादा रस्ता निर्धारित करण्यापूर्वी आम्ही अनेक बाबी पडताळून पाहत असतो. यामध्ये रस्त्याची दिशा आणि आकार यासारख्या गोष्टींचाही विचार केला जातो, असे स्पष्टीकरण गुगलकडून देण्यात आले.