सोमवारी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी संध्याकाळपासून आघाडीचं सर्च इंजिन गुगलच्या अनेक सेवा अचानक ठप्प झाल्या होत्या. जीमेल, युट्यूब, ड्राइव्ह, गुगल डॉक्स अशा सर्व सेवा बंद झाल्या होत्या. जवळपास ४५ मिनिटांपर्यंत ठप्प राहिल्यानंतर गुगलच्या सर्व सेवा पूर्ववत झाल्या. यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही गुगलची सर्व्हिस ठप्प झाली होती, त्यावेळी कंपनीने यामागचं कारण सांगितलं नव्हतं. पण, यावेळी मात्र गुगलने सेवा ठप्प होण्याचं कारण सांगितलं आहे.

इंटर्नल स्टोरेजमुळे उद्भवली समस्या:-
इंटर्नल स्टोरेज कोटातील समस्येमुळे गुगलच्या सेवा ४५ मिनिटे ठप्प झाल्या होत्या, असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, इंटरनेट स्टोरेजचा कोटा संपला होता की अन्य समस्या होती हे गुगलकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. “भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी ५.१७ वाजता इंटर्नल स्टोरेज कोटामध्ये आलेल्या समस्येमुळे गुगलच्या सेवा ठप्प झाल्या होत्या. जवळपास ४५ मिनिटांनंतर साधारण संध्याकाळी ६.०२ मिनिटांनी समस्या सोडवण्यात यश आलं आणि सर्व सेवा पूर्ववत झाल्या”, असं गुगलच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलं. या कालावधीत युजर्सना झालेल्या गैरसोयीसाठी गुगलकडून माफी मागण्यात आली, तसंच भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवणार नाही असा विश्वासही गुगलच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला.