Google’s 21st Birthday: सर्वज्ञ अशा गुगलचा आज वाढदिवस. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा साऱ्यांचा मित्र ‘गुगल’चा आज २१ वा वाढदिवस. जगातल्या प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस विशेष डुडल साकारून सेलिब्रेट करणाऱ्या गुगलनं स्वत:च्या वाढदिवसाचं देखील खास डुडल साकारलं आहे.

गुगलने साकारलेल्या डूडलमध्ये २० व्या शतकाच्या अखरीस वापरात असलेला कम्प्युटर दाखवला आहे. २७ सप्टेंबर १९९८ रोजी गुगलच्या कार्यालयात घेतलेला फोटो डुडलला लावला आहे. त्यामध्ये कम्प्युटरसोबत मॉनिटर, कीबोर्ड, माउस आणि प्रिंटरही दाखवण्यात आला आहे. १९९८ मध्ये सर्गेई ब्रिन आणि लैरी पेज यांनी गुगलची स्थापना केली होती. जगभरातील ४० पेक्षा जास्त देश गुगलचा वापर करतात. गुगलची जगभरात ७० पेक्षा जास्त कार्यालयं आहेत.

१९९८ साली गुगलने आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. पण तरीही तारखेवरुन वाद कायम होता. त्यानंतर १७व्या वाढदिवसापासून २७ सप्टेंबरलाच गुगल अधिकृतपणे आपला वाढदिवस साजरा करु लागला. त्यानुसार हिशोबाने आज गुगलचा २१वा वाढदिवस आहे. ४ सप्टेंबर १९९८ रोजी गुगल पहिल्यांदा जगासमोर आले. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गुगलची स्थापना झाली आणि आज तर इंटरनेट सर्च इंजिनचं जायंट म्हणून गुगलकडे पाहिले जाते.

१९९७ साली कंपनीने डोमेन रजिस्टर केले आणि अधिकृतपणे ‘गुगल’ असे नाव ठेवण्यात आले. २००२ साली गुगलने पहिल्यांदा डूडल तयार केले. जगप्रसिद्ध व्यक्तींची जयंती-पुण्यतिथी, महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे वर्धापनदिन इत्यादींसाठी गुगल आपल्या होमपेजवर डूडल प्रसिद्ध करते. गुगल जगभरात प्रसिद्ध असलेलं सर्च इंजिन आहे. प्रत्येक विषयांवरील माहिती, संदर्भ इथे अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध होतात. सुरुवातीला फक्त दुसऱ्या वेबसाईट्सचे डिटेल्स पुरवल्या जातील, अशी गुगलची कार्यप्रणाली होती. मात्र, या कंपनीने या विचारात बदल करुन असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे जगभरातील माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. आणि त्यावरूनच सुरूवात झाली ‘एका क्लिकवर सर्व काही’ या संकल्पनेची.

भारतात Google.co.in ही सेवा मराठी, हिंदीसह नऊ भारतीय भाषांत उपलब्ध आहे. गुगलने मागील २१ वर्षांत यशाची उत्तुंग झेप घेतली आहे. माहितीचे सारे युग गुगलने आपल्यात सामावून घेतला असून जगापुढे माहितीचे भांडार खुले करून दिले आहे.